Reliance AGM 2022 : रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा (Reliance 5 G Internet) दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. पहिल्या टप्प्यातील जिओ 5 G इंटरनेट सेवा देशातील चार महानगरात सुरू होणार असून पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. रिलायन्स जिओ 5 जीमुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. 


 रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) संपन्न होत आहे. मुकेश अंबानी यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. रिलायन्स जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरात दिवाळीपर्यंत सुरू करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा देणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले. रिलायन्स आपल्या जिओ 5 जी सेवेसाठी अद्यावत तंत्रज्ञान वापर असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओ 5 जी नेटवर्ककरीता दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांनी सांगितले की,  जिओ 5जी सेवा अद्यावत तंत्रज्ञान असलेली इंटरनेट सेवा असणार आहे. आम्ही सर्व ग्लोबल स्मार्टफोन्ससोबत काम करत आहोत. दोन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 


दिग्गज आयटी कंपन्यांसोबत भागिदारी


मुकेश अंबानी यांनी सांगितले की, मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. 


सगळ्यात स्वस्त डेटा


मुकेश अंबानी यांनी सांगितले की रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरात सेवा देणार आहे. देशातील सगळ्यात स्वस्त 5G इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स जिओसोबत 100 मिलियन घरांना जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.


स्वस्तातील 5G मोबाईल फोन देणार


रिलायन्स जिओ स्टॅण्डअलोन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. रिलायन्सने क्वॉलकॉम आणि इंटेलसोबत भागिदारी करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. स्वस्तातील 5G मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स गुगलसोबत भागिदारी करणार आहे. 


जिओकडून एअरफायबरची घोषणा


जिओकडून एअरफायबरची घोषणा करण्यात आली आहे. जिओ एअरफायबरमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा स्पीड अधिक असणार. फिक्स्ड ब्रॉडबॅण्डमध्ये भारत येत्या काळात पहिल्या 10 देशांमध्ये असणार असल्याचे सांगत आले.