Reliance AGM: देशातील महत्त्वाचा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) सोमवारी 29 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी या बैठकीत मोठ्या घोषणा करण्याची शक्यता असून यामध्ये कंपनीत नेतृत्व बदलही होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 5 जी सेवेबाबतही अंबानी घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे या वार्षिक बैठकीकडे लक्ष लागले आहे. 


वारस कोण असणार?


मुकेश अंबानी हे जून महिन्यातच रिलायन्स जिओच्या चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. रिलायन्स जिओची धुरा त्यांचे सुपुत्र आकाश अंबानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुकेश अंबानी कंपनीती धुरा स्वत: कडे ठेवणार का याकडे लक्ष लागले आहे.  मुकेश अंबानी हे पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि सुपुत्र अनंत यांच्या जबाबगदारीतही वाढ करू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. ईशा आणि अनंत हे याआधीच रिलायन्स समूहातील अनलिस्टेड कंपनीच्या संचालकपदावर आहेत.


5 जी सेवा कधी सुरू होणार?


रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्रमच्या लीलावात बाजी मारली आहे. रिलायन्स जिओला देशातील सर्वाधिक सर्कलमध्ये 5 जी स्पेक्ट्रम मिळाले आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर दरात मोठी उसळण दिसून आली आहे. उद्या होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी जिओच्या 5 जी बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 


ग्रीन एनर्जीवर लक्ष


रिलायन्स ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अंबानी यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर केले होते. कंपनीने मागील वर्षी सोलर मॉड्युल्स, हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर्स, फ्यूल सेल्स आणि स्टोरेज बॅटरी तयार करण्यासाठी 4 गीगा-फॅक्टरीज तयार करण्याची घोषणा केली  होती. रिलायन्सने जागतिक पातळीवर ग्रीन एनर्जीशी संबंधित काही लहान कंपन्यांना अधिग्रहित केले आहे. 


मोठी घोषणा होण्याची शक्यता


रिलायन्स उद्योग समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. वर्ष 2016 मध्ये AGM मध्ये रिलायन्स जिओची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 मध्ये सौदी अरेबियाची सरकारी कंपनीसोबत एनर्जी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2021 मध्ये ग्रीन एनर्जीकडे लक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यंदाच्या AGM मध्ये कोणती घोषणा होणार याकडे लक्ष लागले आहे.