Home Loan Interest rate: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात (Repo Rate) 0.25 टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट आता 5.25 टक्क्यांच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांकडून गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले जातील, अशी चर्चा सुरु झाली होती. यामुळे सामान्य ग्राहकांचे डोळे बँकांच्या व्याजदर कपातीकडे (Interest Rate) लागले होते. या पार्श्वभूमीवर आता देशातील चार बँकांनी रेपो रेट कपातीनंतर आपल्या व्याजदरात कपात केली आहे.

Continues below advertisement

बँक ऑफ बडोदाने  व्याज दरात 0.25 टक्क्यांची कपात केली. बडोदा लिंक्ड लेंडिंग रेट(BRLLR) 8.15 टक्क्यांहून कमी होऊन आता 7.90 टक्क्यांवर आला आहे. तर दुसरी सरकारी बँक इंडियन बँकेने (Indian Bank) आरबीआयच्या निर्णयानंतर रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट कमी केला. रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट 8.2 टक्क्यांहून 7.95 टक्क्यांवर आला.

तर देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) रेपो बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली. हा दर आता 8.1 टक्के इतका करण्यात आला आहे. तर करुर वैश्य बँकने EBR-R मध्ये 0.25 टक्के कपात केली. आता व्याज दर 8.80 टक्क्यांहून 8.55 टक्के इतका केला आहे. त्यामुळे या सर्व बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना या व्याजदर कपातीचा लाभ मिळणार आहे. तसेच नवीन ग्राहकांनाही कर्ज घेताना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. आता देशातील इतर बँका गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदर कधी कमी करणार, याकडे सामान्य ग्राहकांच्या नजरा लागल्या आहेत.

Continues below advertisement

Repo Rate news: रेपो रेट म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेकडून व्यापारी बँकांना ज्या दरानं कर्ज दिलं जातं त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं. आरबीआय कमी व्याज दरावर व्यापारी बँकांना कर्ज देतात. हेच पैसे बँका सामान्य ग्राहकांना कर्ज म्हणून वितरीत करतात. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यास बँका देखील त्यांच्या कर्जाचा व्याजदर कमी करतात. गृहकर्जाचा व्याजदर हा शक्यतो फ्लोटिंग स्वरुपात मोडणारा असतो. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्जाचे व्याजदरही कमी होतात. व्याजदरात थोडीशीही कपात झाली तर कर्ज परतफेड करणाऱ्यांना त्याचा दीर्घकालीन फायदा होत असतो.

आणखी वाचा

आरबीआयनं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं घटवला, गृहकर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार, किती पैसे वाचणार?