RBI Repo Rate: किरकोळ महागाई दरात घट झाली असल्याचे समोर आले आहे. किरकोळ महागाई दरात घट झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी समाधान व्यक्त केले. महागाई दरात झालेली घट ही समाधान देणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. महागाई दरात घट म्हणजे आरबीआयचे पतधोरण योग्य दिशेने जात असल्याचे हे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले. 


रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाई दरात घट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, पण चलनविषयक धोरणाबाबत आरबीआयच्या भूमिकेबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. RBI चे 8 जून रोजी पतधोरण जाहीर होणार आहे.  त्यावेळी आरबीआय व्याज दराबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती त्यांनी दिली. 


G-20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शक्तीकांत दास यांनी 2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहील अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, खासगी गुंतवणुकीत तेजी दिसून येत आहे. पोलाद, पेट्रोकेमिकल्स आणि सिमेंट क्षेत्रातील गुंतवणुकीत तेजी आहे. भारताचा विकास जर 6.5 टक्के दराने झाला, तर जागतिक विकासात त्याचे योगदान 15 टक्के असू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


त्यांनी म्हटले की, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर होणारा खर्च वाढवण्याची गरज आहे. यासोबतच सुधारणा कायम ठेवण्यावर आणि उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावरही त्यांनी भर दिला.


किरकोळ महागाई 4.70 टक्क्यांपर्यंत खाली आल्यानंतर आता महागड्या कर्जातून दिलासा मिळण्याची आशा वाढू लागली आहे. या आकड्यानंतर, असे मानले जाते की जून महिन्यात आरबीआयचे पतधोरण जाहीर करताना, जर पॉलिसी रेट म्हणजे रेपो रेट कमी केला नाही तर तो सध्याच्या पातळीवर स्थिर ठेवेल. या वर्षाच्या उत्तरार्धात व्याजदरात कपात अपेक्षित आहे. 


एप्रिल महिन्यात रेपो दर स्थिर


एप्रिल महिन्यात आरबीआयने आपले पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला होता. महागाई आटोक्यात येत  असल्यानं आरबीआयच्या रेपो  रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या आरबीआयचा रेपो रेट 6.50 टक्के आहे. 


किरकोळ महागाई दरात घट


किरकोळ महागाई दरात (ग्राहक किंमत निर्देशांक) घट झाली आहे. एप्रिलमध्ये, नवीन आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या महिन्यात, किरकोळ चलनवाढीचा दर 4.70 टक्क्यांवर आला आहे. मार्च 2023 मध्ये हा दर 5.66 टक्के होता. हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा महागाई दर खाली आला असून तो 18 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या दरम्यान खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी झाला आहे. मार्च 2023 मध्ये अन्नधान्य महागाई 4.79 टक्क्यांवरून 4 टक्क्यांच्या खाली 3.84 टक्क्यांवर आली आहे. एक वर्षापूर्वी, एप्रिल 2022 मध्ये, किरकोळ महागाई 7.79 टक्के आणि अन्नधान्य महागाई 8.31 टक्के या सर्वोच्च पातळीवर होती.