RBI Gold Reserve Deposits: वाढती महागाई आणि शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या काळात अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. मागील एक वर्षभरात देशातची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेने आपली सोनं खरेदी दुप्पट केली आहे. वर्ष 2021-22 या वर्षात रिझर्व्ह बँकेने 65 टन सोन्याची खरेदी केली आहे. आता आरबीआयकडे सोन्याचा साठा वाढला असून 760.42 टन इतका झाला आहे. मागील दोन वर्षात आरबीआयने 100 टन सोनं खरेदी केली आहे. 


जागतिक पातळीवर सुरू असलेला तणाव आणि जागतिक बाजारात ( Global Financial Market) सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमींवर चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँकेने सोनं खरेदी केली असल्याचे म्हटले जात आहे. जून 2020 ते मार्च 2021 या दरम्यान रिझर्व्ह बँकेने 33.9 टन सोने खरेदी केली होती. मात्र, 2021-2022 मध्ये आरबीआयने दुप्पट म्हणजे 65 टन सोने खरेदी केले होते. 


3.22  लाख कोटी रुपयांचे सोने


आरबीआयच्या गोल्ड होल्डिंगचे मूल्य 30 टक्क्यांनी वाढून 3.22 लाख कोटी रुपये झाले आहेत. यातील 1.25 लाख कोटी रुपयांचे सोनं हे आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट अॅण्ड गोल्ड जवळ आहे. यामध्ये गोल्ड डिपॉझिटचाही समावेश आहे. तर, 1.97 लाख कोटी रुपयांचे सोनं  बँकिंग डिपार्टमेंटमध्ये मालमत्ता म्हणून ठेवण्यात आले आहे. आरबीआयनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी उसळण आणि अतिरिक्त सोनं खरेदी केल्याने आरबीआयकडील सोन्याच्या मूल्यात वाढ झाली आहे. त्याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे. 


आरबीआयकडे सोन्याचा किती साठा?


आरबीआयच्या मालमत्तेत 28.22 टक्के परदेशी चलनाचा समावेश आहे. तर, 71.78 टक्के सोनं आहे. आरबीआयकडे 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 760.42 टन सोनं होते. यामध्ये 453.52 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, 295.82 टन सोने भारतात आहे.