Ratan Tata News : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या वीज कंपनीने गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानींचं (Mukesh Ambani) टेन्शन वाढवलं ​​आहे. चालू आर्थिक वर्षात टाटा पॉवरनं (Tata Power) दर तासाला 2.28  कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पॉवर आपला बहुतांश भांडवली खर्च अक्षय ऊर्जेवर करणार आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानीही या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत रतन टाटा यांच्या या योजनेमुळं अदानी आमि अंबानी याचं टेन्शन वाढू शकतं. 


टाटा पॉवर करणार 20 हजार कोटी रुपयांचा खर्च 


आपला व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशानं टाटा ग्रुपने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये चालू आर्थिक वर्षात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी टाटा पॉवर 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मागील वर्षी कंपनीने 12 हजार कोटी रुपये खर्च केले होते. टाटा पॉवर चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भांडवली खर्चासाठी 20,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या 105 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांना याबाबतची माहिती दिली. भांडवली खर्चाचा मोठा भाग कंपनीच्या अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओला गती देण्यासाठी असणार आहे तर  उर्वरित रक्कम पारेषण आणि वितरण व्यवसायावर खर्च केली जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. 


मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंपनी करणार अधिक खर्च


टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा पॉवर 2024-25 मध्ये 20,000 कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याची योजना आखत आहे. 2023-24 मध्ये गुंतवलेल्या 12,000 कोटींच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच जास्त असल्याचे ते म्हणाले. टाटा पॉवर इतर राज्यांमध्ये नवीन वितरण विस्ताराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करेल. याशिवाय, सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी छोट्या मॉड्यूलर अणुभट्ट्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता देखील तपासेल असंही ते म्हणाले. टाटा पॉवर कंपनी ही दोन्ही प्रकल्पांमधून पाच वर्षांत 15 GW स्वच्छ ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवत आहे. ही क्षमता सध्या 9 गिगावॅट आहे. वितरण व्यवसायाच्या विस्ताराद्वारे पाच कोटी ग्राहक जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ज्यांची सध्याची संख्या 1.25 कोटींहून अधिक असल्याची माहिती चंद्रशेखरन यांनी दिली.


टाटा पॉवरच्या गुंतवणूकदारांना नफा


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी टाटा पॉवरचे शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले होते. बीएसईच्या आकडेवारीनुसार, टाटा पॉवरचा समभाग 2.30 रुपयांच्या घसरणीसह 436.90 रुपयांवर बंद झाला. मात्र, कंपनीचे शेअर 441 रुपयांवर उघडले. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या समभागांनी 445.25 रुपयांचा दिवसाचा उच्चांक देखील गाठला. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1,39,604.38 कोटी रुपये आहे. चालू वर्षात टाटा पॉवरच्या गुंतवणूकदारांनी 32 टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे.


महत्वाच्या बातम्या:


टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?