Name Change On Train TIcket नवी दिल्ली: भारतात दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम आणि पर्याय उपलब्ध करुन दिले जातात. रेल्वेनं प्रवास करायचा असल्यास आयआरसीटीसी किंवा थेट रेल्वे स्टेशनवरील बुकिंग काऊंटरवरुन तिकीट आरक्षित करावं लागतं. रेल्वेच्या सध्याच्या नियमानुसार दोन महिन्यांच्या कालावधीपर्यंतचं तिकीट बुक करता येतं. मात्र, काही कारणांमुळं एखाद्या प्रवाशाचं तिकीट बुक केलं मात्र तो प्रवास करु शकणार नसेल तर ते तिकीट दुसऱ्या कुणाला देता येतं का? किंवा रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचं नाव बदलता येतं का असं अनेकांना वाटतं. रेल्वे तिकिटावरील प्रवाशाचं नाव बदलण्याची सुविधा उपलब्ध असल्याचं अनेकांना माहिती नसतं. रेल्वेच्या या सुविधेबाबत जाणून घेऊयात.  

Continues below advertisement

Railway Ticket Passanger Name Change : रेल्वे तिकिटावरील प्रवाशाचं नाव कसं बदलायचं?

रेल्वेनं आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचं नाव बदलण्याची सुविधा फक्त कन्फर्म तिकिटासाठी दिलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटींचं पालन करावं लागतं. हा पर्याय तिकिटधारकाच्या जवळच्या नातेवाईकांसाठी मर्यादित आहे. योग्य वेळेत रेल्वेच्या तिकिट बुकिंग काऊंटरला भेट देऊन प्रवाशाचं नाव बदलता येतं. रेल्वेकडून ही सुविधा फक्त कन्फर्म तिकीट धारकांसाठी दिली जाते. वेटिंग लिस्ट किंवा आरएसी साठी ही सुविधा नसते. प्रवाशाचं नाव बदलायचं असल्यास ते फक्त जवळच्या नातेवाईंकांमध्येच बदललं जाऊ शकतं. यामध्ये आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, मुलगा मुलगी याशिवाय सरकारी कर्मचारी त्यांच्या विभागाच्या लेखी अर्जाच्या आधारे नाव बदलू शकतात.  

नियमांनुसार रेल्वे सुटण्याच्या 24 तासांपूर्वी ही प्रक्रिया करावी लागते. पहिल्यांदा तिकीट जमा करावं लागतं. एका तिकिटावर एकदाच प्रवाशाचं नाव बदलता येते. अचानक प्रवास रद्द करावा लागणे किंवा कुटुंबातील एखादा सदस्य प्रवास करण्यास इच्छुक असेल तर या सुविधेचा लाभ घेता येतो.

Continues below advertisement

अर्ज कसा करावा?

रेल्वे तिकिटावरील प्रवाशाचं नाव बदलण्याची प्रक्रिया ऑनलाईन होत नाही. प्रवाशाला रेल्वे तिकीट बुकिंग काऊंटरवर जावं लागतं. तिकीट ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढलेलं असलं तरी त्याची प्रिंट आऊट घेऊन जावं लागतं. काऊंटरवर प्रवाशाचं नाव बदलण्याचा अर्ज करावा लागतो. ज्यामध्ये नव्या प्रवाशाच्या डिटेल्स लिहाव्या लागतात. रेल्वे तिकिटावरील ज्यांचं नाव बदलायचं आहे आणि ज्याचं नाव त्यात नोंदवायचं आहे, अशा दोघांचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र द्यावं लागतं.  

सर्व कागदपत्र मिळताच रेल्वे कर्मचारी रेल्वे तिकिटावर नवं नाव अपडेट करतात आणि त्याची पोहोच किंवा नवं तिकीट देतात. यासाठी तुम्हाला तिकीट रद्द किंवा नवं तिकीट बुक करण्याची गरज नसते. तिकीट रद्द करण्यासाठी घेतलं जाणारं शुल्क देखील द्यावं लागत नाही.