IIFL Wealth Hurun India Rich List : मूळची भारतीय असलेल्या अमेरिकन नेहा नारखेडेनं स्वत:च्या हिमतीवर जगातील श्रीमंताच्या यादीत स्थान पटकावलेय. 37 वर्षीय आंत्रप्रेन्योर नेहा नारखेडे हिने मेहनत, चिकाटी आणि स्वत:च्या हिमतीवर यशाला गवसणी घातली आहे.
पुण्यात जन्मलेल्या नेहा नारखेडे हिने 37 व्या वर्षी मिळवलेलं यश, अनन्यसाधारण आहे. नेहा नारखेडे हिने IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (Wealth Hurun India Rich List ) मध्ये स्थान पटकावलेय. श्रीमंताच्या यादीत नेहा सर्वात तरुण सेल्फ मेड महिला आंत्रप्रेन्योर आहे. नेहा नारखेडे हिचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर कम्प्युटर सायन्समधील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली होती. नेहा नारखेडे ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील झोडगा या गावची आहे.आई वडील नोकरी निमित्त पुण्याला आले होते. नेहाचा जन्म पुण्याच्याच आहे. पण ती मूळ गावी लहानपणी क्वचितच आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून ती इकडे आली नसल्याची माहिती तिचे चुलत भाऊ कुणाल नारखेडे यांनी दिली आहे. कुणाल नारखेडे यांचं मलकापूर येथे कुणाल प्रॉव्हिजन्स नावाचं किराणा दुकान आहे. नेहाचे आईवडील पुण्याला राहत असत जे की आता हयातीत नाहीत. नेहाने पुण्याच्या कुलकर्णी नामक युवकाशी आंतरजातीय विवाह केला व अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतर तिच्याशी कुठलाही संपर्क झाला नसल्याची माहिती कुणाल नारखेडे यांनी दिली.
नेहा नारखेडे हिने जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीमधून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलेय. नेहा नारखेडे सध्या 'कंफ्लुएंट' या कंपनीची सह संस्थापक आहे. त्याशिवाय आपाचे काफ्का (Apache Kafka) या ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टमला डेव्हलप करण्यात नेहा यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. नेहा नारखेडे सध्या अनेक तंत्रज्ञान कंपनीमध्ये सल्लागार आणि गुंतवणूकदार आहे. हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये नेहा नारखेडे हिने 336 वं स्थान पटकावलं आहे. नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती अंदाजे 4700 कोटी रुपये इतकी आहे.
लिंक्डइन आणि ओरैकलमध्येही केलेय काम -
स्वत:ची कंपनी सुरु करण्याआधी नेहा नारखेडे यांनी लिंक्डइन आणि ओरैकल या कंपन्यामध्ये काम केलेय. त्याशिवाय अपाचे काफ्का सॉफ्टवेयर तयार करणाऱ्या संघाचा त्या महत्वाच्या सदस्य राहिल्या आहेत. नेहा नारखेडे यांनी 2014 मध्ये स्वत:ची कंपनी सुरु केली. 15 वर्षापूर्वी नेहा नारखेडे या भारतातून अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांनी तिथे अमेरिकीत कम्प्युटर सायन्समधून मास्टर्सची पदवी घेतली होती. नेहा नारखेडे यांनी पुणे विद्यापिठातून पदवीचं शिक्षण घेतलेय.
फोर्ब्सच्या श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीमध्ये नेहा नारखेडे यांनी 57 वाा क्रमांक पटकावला होता. 2018 मध्ये फोर्ब्स ने तंत्रज्ञानाशी निगडित असणाऱ्या महिलांच्या यादीत नेहा नारखेडे यांच्या नावाचा समावेश केला होता. हुरुन इंडिया यांच्यानुसार, श्रीमंताच्या यादीत 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या एकूण 1103 लोकांचा सहभाग होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीत यंदा 96 जणांची वाढ झाली आहे.