PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अलिकडेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान मोदींचा हा दौरा सफल ठरल्याचं बोललं जात आहे. यामुळे येत्या काळात भारतात अब्जावधी डॉलर्सचा फायदा होणार आहे. गुगल आणि ॲमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी आगामी काळात भारतात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारतासाठी फार फायदेशीर ठरल्याचं मानलं जात आहे. यामुळे भारत-अमेरिका संबंध मजबूत झाले असून यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येणार आहे.


ॲमेझॉन कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार


आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतात आगामी काळात मोठी गुंतवणूक करणार आहे. ॲमेझॉन कंपनी भारतात एकूण 26 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 2600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. अमेरिका दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ॲमेझॉन कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत ही मोठी घोषणा केली आहे. याआधी ॲमेझॉन कंपनीने भारतात 11 बिलियन डॉलर म्हणजे 1100 कोटींची गुंतवणूक केली आहे. आता कंपनी आणखी 15 बिलियन डॉलरची अर्थात भारतीय रुपयांमध्ये 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यानंतर ॲमेझॉन कंपनीची भारतातील गुंतवणूक 2600 कोटीपर्यंत पोहोचेल.


गुगल कंपनी भारतात 1000 कोटींची गुंतवणूक करणार


दिग्गज टेक कंपनी गुगल भारतात 10 बिलियन डॉलर म्हणजे 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह, कंपनी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक म्हणजेच गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे गुगलचं जागतिक फिनटेक ऑपरेशन सेंटर उभारण्यात येईल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. पिचाई यांनी सांगितलं की, गुगल कंपनी 10 अब्ज डॉलर्स इंडिया डिजिटायझेशन फंडाच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक करत राहील. 


एलॉन मस्क यांचेही भारतात गुंतवणुकीचे संकेत 


टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेल्यानंतर भारतात गुंतवणुकीचे संकेत दिले. मस्क यांनी संकेत दिले आहेत की, त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतात प्रवेश करेल आणि त्यासाठी गुंतवणूक करेल. पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे संकेतही मस्क यांनी दिले आहेत. यासोबतच त्यांची सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


भारतात सेमीकंडक्टरमध्ये मोठी गुंतवणूक


पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील आणखी एक यश म्हणजे भारतात अमेरिकन चिप कंपनीही मोठी गुंतवणूक करणार आहे. अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉन भारतात गुंतवणूक करेल अशी, चर्चा होती. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावेळी मायक्रॉन कंपनीने गुंतवणूक आणि प्लांट उभारण्याची मोठी घोषणा केली आहे. मायक्रॉन कंपनीने गुजरातमध्ये 2.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून कंपनी सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे. या प्लांटमध्ये सेमीकंडक्टर बनवले जाणार नाहीत, तर चिप टेस्टिंग आणि पॅकिंग करण्यात येणार आहे.