PM Kisan Samman Nidhi Yojana नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम येत्या काही तासात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम देशभरातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Continues below advertisement

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याचं वितरण आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी येथून करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम देशभरातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल. 22 व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून  18 हजार 640 कोटी रुपये वर्ग केले जातील. 13 मार्चला सांयकाळी 5.00 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम 19 नोव्हेंबर 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर आता 13 मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात 22 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटनुसार 1 जानेवारी 2026 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील  90 लाख 73 हजार 678 शेतकरी यासाठी पात्र आहेत. 13 मार्चला पंतप्रधानांच्या हस्ते रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष राज्यातील किती शेतकऱ्यांना निधी मिळाला हे समोर येईल. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी?

महाराष्ट्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केलेली आहे. या योजनेतून आतापर्यंत सात हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. सातव्या हप्त्याची रक्कम 9 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आली होती. या योजनेचे महाराष्ट्रात 91 लाख शेतकरी लाभार्थी आहेत. आता 2025-26 हे आर्थिक वर्ष संपण्यास काही थोडेच दिवस शिल्लक असल्यानं काही दिवसांमध्ये सरकार नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये मिळतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेप्रमाणं तीन समान हप्त्यात 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम डीबीटी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. 

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. या योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत.