Pune Crime News : पुण्यातील जुन्नर तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर आधी जीवघेणा हल्ला केला आणि मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे नाव महेश डामसे होते. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. 

जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला असता आढळला मृतदेह

महेशचे डामसेचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती. या रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट आखला. जुन्नरमधील एका वस्तीगृहातून ही तरुणी महाविद्यालयात निघाली होती. तेव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर-चेहऱ्यावर वार केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला. तेव्हा आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळली तर तिथंच एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये त्या परिसरात तो एकटाच गेल्याचं दिसून आलं, त्यामुळं ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरुन गेला आहे.

पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय तरुणांचा पोटकालव्यात बुडून मृत्यू

सातारा जिल्ह्यातील हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती येथे आज दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेले तीन परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये २० ते ३५ वयोगटातील ओडिसा राज्यातील तरुणांचा समावेश आहे.या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक ,श्रीराम जगाई हेबरम, सतीन बीवजी नाईक तिघेही मूळचे ओडीसा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईप मधून बाहेर काढले असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रॅश ड्रायव्हिंगनं घेतला सनफ्लॅग कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा बळी 

भंडारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असलेल्या तरुणाचा रॅश ड्रायव्हिंगनं बळी घेतला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन दिवसांपूर्वी घडली होती. कर्तव्यावर असलेला हा सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करीत असताना त्याचवेळी भरधाव आणि रॅश ड्रायव्हिंग करून कंपनीत प्रवेश करणाऱ्या एका कार चालकानं त्याला जबर धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. प्रथम भंडाऱ्यात आणि नंतर त्याच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सितीन रहांगडाले (25) असं मृतकाचं नावं असून तो मुळचा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोड्यातील डव्वेटोला येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी आज त्याचा मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवला. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला आणि मृत्युनंतरचे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. यानंतर सनफ्लॅग कंपनी प्रशासनं आणि सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मोबदला आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळलं. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरठी आणि भंडारा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.