मुंबई : वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे (PhonePe) लवकरच भारतात आपला आयपीओ (IPO) लाँच करणार आहे. सोबतच कंपनीचे मुख्यालय सिंगापूरहून भारतात हलवण्याची तयारीही पूर्ण झाल्याची माहिती आहे. ३ ऑक्टोबरलाच आपला अधिवास सिंगापूरहून भारतात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.


दरम्यान कंपनीने आपलं मुख्यालय भारतात स्थलांतर करण्यातबाबत फोनपेने सांगितले की, ही प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण झाली आहे. सर्वप्रथम, गेल्या एका वर्षात, कंपनीने फोन पे सिंगापूरचे सर्व व्यवसाय आणि उपकंपन्या थेट PhonePe Pvt Ltd (India) कडे हस्तांतरित केल्या आहेत. यामध्ये विमा ब्रोकिंग आणि संपत्ती ब्रोकिंग सेवांचा समावेश आहे.


प्रक्रियेचे तीन टप्पे


दुसर्‍या टप्प्यात, फोनपे (PhonePe) कंपनीच्या बोर्डाने अलीकडेच नवीन कर्मचारी स्टॉक ओनरशिप स्कीम (ESOP) तयार करण्यास आणि फोनपे ग्रुपच्या कर्मचार्‍यांना फोनपे इंडियाच्या नवीन योजनेअंतर्गत नवीन ESOP जारी करण्यास मान्यता दिली आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. शेवटी, फोनपेने नवीन उदारीकृत ऑटोमॅटिक ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (ODI) नियमांनुसार अलीकडेच विकत घेतलेल्या IndusOS Appstore (OSLAbs Pte Ltd) ची मालकी सिंगापूरहून भारतात हस्तांतरित केली आहे.


कंपनीकडून आधीच योजनेचा खुलासा 


यापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, फोनपेचे सह-संस्थापक आणि सीईओ समीर निगम यांनी खुलासा केला होता की कंपनी त्यांचे नोंदणीकृत युनिट सिंगापूरहून भारतात हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. बोर्डाने या आराखड्याला आधीच मंजुरी दिली असून प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फारच कमी अवधी शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले होते. आम्ही मेड इन इंडिया कंपनी आहोत. आमची सर्व कार्यालये, डेटा केंद्रे आणि कर्मचारी येथे आहेत. आपण या बाजारपेठेत योग्य ते योगदान देऊ असंही त्यांनी सांगितलं


UPI पेमेंटमध्ये सर्वाधिक वाटा


भारतात आपले होल्डिंग युनिट परत आणण्यासाठी फोनपेचे पाऊल अनेक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे ज्यांनी आधीच आपला व्यवसाय परदेशात हलवला आहे. पुढील वर्षी आयपीओ आणण्याची कंपनीची योजना आहे. सध्या, फोनपे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये एक प्रमुख खेळाडू आहे, ज्याचा बाजार हिस्सा 47 टक्के आहे. UPI स्टार्टअप्ससाठी म्युच्युअल फंड आणि विम्यासह इतर वित्तीय सेवांची विक्री करण्यासाठी कंपनीचे पाऊल महत्त्वपूर्ण ठरू शकते.