Petrol Diesel Price :  भारतात मागील काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) मोठी कपात झाली असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. या काळाच्या दरम्यान भारताचे शेजारील देश आणि काही पाश्चिमात्य देशांमध्ये इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार झाला असल्याचे केंद्र सरकारने (Central Govt) म्हटले आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी उचललेल्या पावलांमुळे दर स्थिर आणि कमी झाले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले. 


राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत, परंतु शेजारील आणि पाश्चात्य देशांमध्ये वाढल्या आहेत. सरकारने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान, भारतात पेट्रोलच्या किंमतीत 11.82 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 8.94 टक्के घट झाली. दुसरीकडे, शेजारील श्रीलंकेत पेट्रोलच्या किमतीत 54.32 टक्के आणि पाकिस्तानमध्ये 41.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 



अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर 9.32 टक्के, 7.3 टक्के आणि 11.36 टक्के जास्त आहेत. डिझेलच्या दराच्या बाबतीत श्रीलंकेत 110.24 टक्के, तर पाकिस्तानमध्ये 53.55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2021-नोव्हेंबर 2023 दरम्यान, डिझेलच्या किमती अमेरिकेमध्ये 27.59 टक्के, ब्रिटनमध्ये 9.92 टक्के आणि जर्मनीमध्ये 11.36 टक्क्यांनी वाढल्या असल्याचे केंद्र सरकारने म्हटले. 



नागरी हितासाठी पावले उचलली; सरकारचा दावा 


“कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या आव्हानाला तोंड देत केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी पावले उचलली आहेत,” असे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. "नियोजन आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे, सरकारने ग्राहकांवर कमीत कमी परिणाम सुनिश्चित करताना इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत." अधिकृत आकडेवारी दर्शवते की कच्च्या तेलाच्या आयातीची सरासरी किंमत या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रति बॅरल 92.41 डॉलर होती, जी आता डिसेंबरमध्ये प्रति बॅरल 86.58 डॉलर इतकी कमी झाली आहे.


रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढली


युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून तेलाची आयात वाढवली आहे. सौदी अरेबियाला मागे टाकत रशिया आता भारताला तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. शिवाय, अमेरिकेने लॅटिन अमेरिकन देशावरील निर्बंध उठवल्यानंतर, भारतीय तेल कंपन्यांनी देखील त्यांच्या पुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यासाठी व्हेनेझुएलामधून सोर्सिंग सुरू केले आहे.