Online App Loan Tips : आजकाल अनेकजण वैयक्तिक गरजांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेतात. अशा प्रकारच्या अॅपवरून त्वरीत कर्ज मिळू शकते. पण असे त्वरित कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेकजण काही मूलभूत चुका करतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य माहिती आणि काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास अशा समस्यांपासून बचाव करता येतो. त्यासाठी खाली दिलेल्या मुद्द्यांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
1. फक्त RBI नोंदणीकृत NBFCs कडूनच लोन घ्या
अनेक फिनटेक अॅप्स RBI कडे नोंदणीकृत नसतात. अशा अॅप्सवर विश्वास ठेवल्यास कर्जाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता असते. लोन घेण्यापूर्वी RBI ने जाहीर केलेल्या नोंदणीकृत नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांची (NBFCs) यादी तपासा आणि केवळ त्यांच्याशी संलग्न असलेल्या अॅप्सवरूनच लोन घ्या.
2. अॅपचे डाउनलोड्स पाहून निर्णय घेऊ नका
अनेक फेक अॅप्स लाखो वेळा डाउनलोड झालेली असतात, परंतु त्यांची विश्वासार्हता शून्य असते. Google ने गेल्या दोन वर्षांत 4,700 हून अधिक बनावट कर्ज अॅप्स हटवले आहेत. काही अॅप्सचे 1 लाखांहून अधिक डाउनलोड असूनही, त्या अॅप्समुळे हजारो लोक फसले आहेत. त्यामुळे केवळ डाउनलोडच्या आधारावर निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते.
3. ग्राहक सेवेची खात्री करा
कोणतेही अॅप वापरण्यापूर्वी, त्याची ग्राहक सेवा प्रणाली तपासा. जर अॅपमध्ये फक्त चॅट सपोर्ट असेल आणि फोन नंबर किंवा ईमेल उपलब्ध नसेल, तर तुमच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आणि हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
4. कर्जाच्या अटी काळजीपूर्वक वाचा
कर्ज घेताना व्याजदर, प्रक्रिया शुल्क, लपवलेले शुल्क, परतफेड कालावधी आणि इतर अटी यांची स्पष्ट माहिती घ्या. अनावधानाने मंजूर केलेल्या अटींमुळे आर्थिक ओझं वाढू शकते.
5. शक्यतो बँकांकडूनच कर्ज घ्या
फिनटेक अॅप्सच्या तुलनेत बँकांकडून मिळणारे कर्ज अधिक सुरक्षित आणि पारदर्शक असते. जर शक्य असेल, तर आधी बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय निवडा.
ऑनलाइन कर्ज घेणे सोपे असले तरी त्यात अनेक धोके दडलेले असतात. योग्य माहिती आणि सतर्कतेच्या आधारे कर्ज घेणे गरजेचे आहे. नेहमी RBI नोंदणीकृत अॅप्सवर विश्वास ठेवा, ग्राहक सेवेची खात्री करा आणि लोन अटी पूर्णपणे समजूनच पुढे जा. अन्यथा, काही क्षणांची घाई तुमच्यासाठी दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक अडचणी निर्माण करू शकते.