LICHF Interest Rate: एलआयसी हाउसिंग फायानान्सने (LIC Housing Finance) सोमवारी आपल्या प्राइम लेंडिग दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. या दरवाढीनंतर गृह कर्जावरील व्याज दर आता 8 टक्क्यांपासून सुरू होणार आहे. याआधी एलआयसी हाउसिंग फायनान्सचे गृहकर्ज 7.50 टक्के इतके होते. नवीन व्याज दर आजपासून लागू करण्यात आला आहे.
एलआयसी हाउसिंग फायनान्सने 18 ऑगस्ट रोजीच याबाबत एक ट्वीट करून कर्ज व्याज दरवाढीचे संकेत दिले होते. या ट्वीटमध्ये कंपनीने आपल्या ट्वीटर हॅंडलवर रेपो दरात वाढ केल्याने व्याज दरवाढ कशी होते, याबाबत माहिती दिली होती.
एलआयसी हाउसिंग फायनान्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वाय. विश्वनाथ गौड यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने 5 ऑगस्ट रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली. हा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य निर्णय होता. रेपो दरात वाढ केल्याने ईएमआय अथवा गृह कर्जाच्या अवधीत मोठा चढ-उतार आला आहे. मात्र, घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे एलआयसी एचएफएलच्या व्याज दरात वाढ ही बाजाराच्या अनुषंगाने असल्याचे सांगण्यात येत आहे.
एलआयसी हाउसिंग फायनान्सने व्याज दरवाढीचा घेतलेला निर्णय हा रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाच्या अनुरुप आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे.
महागाई दरात घट, पण...
किरकोळ महागाई दरातील घसरणीनंतर घाऊक मूल्य सूचकांक आधारीत महागाई दरातही (Wholesale inflation Rate) घट झाली आहे. जुलै महिन्यात घाऊक महागाई दर 13.93 टक्के इतका नोंदवण्यात आला. तर, जून महिन्यात हा घाऊक महागाई दर 15.18 टक्के इतका नोंदवण्यात आला. मे 2022 मध्ये हा दर 15.88 टक्क्यांच्या आसपास होता. जुलै महिन्यात मागील पाच महिन्यातील सर्वात कमी घाऊक महागाई दर नोंदवण्यात आला आहे.
भारतात किरकोळ महागाई दरात घट होऊ लागली असल्याचे चित्र आहे. जगातील अनेक देश महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. भारतात किरकोळ महागाई दरात घट झाली असून 6.71 टक्क्यांवर आला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 6 टक्के दराच्या मर्यादेपेक्षा हा दर अधिक आहे. रिझर्व्ह बँकेची आगामी पतधोरण बैठक दोन महिन्यांनी पार पडणार आहे. त्या दरम्यान महागाईचा दर 6 टक्क्यांहून खाली आला तर रेपो दर कमी होऊ शकतो.