Post Office Investment Scheme :  मागील काही काळापासून बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज (Fix Deposite Interest rate) कमी झाले आहेत. पूर्वीप्रमाणे मुदत ठेवींवर व्याज चांगले मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकजण मुदत ठेवीला प्राधान्य देतात. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा हवा असल्यास पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास बँकेतील एफडीपेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) असे या योजनेचे नाव आहे. 


किती टक्के व्याज?


पोस्ट ऑफिस स्कीम नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 6.8  टक्के व्याज मिळते.  बँकेतील मुदत ठेवीवर साधारणपणे 5.80 टक्के व्याज मिळते. अशा परिस्थितीत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधील गुंतवणुकीवर सुमारे 1 टक्के जास्त व्याजदराचा लाभ मिळतो. या योजनेत कोणतीही व्यक्ती एका वर्षात किमान 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. जर तुम्ही 10 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास मॅच्युअरिटीवर तुम्हाला गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम मिळू शकते. त्याशिवाय या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर खात्याच्या कलम 80 सी नुसार तुम्हाला 1.5 लाखापर्यंत सवलत मिळू शकते. 


नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची वैशिष्ट्ये: 


- या योजनेतील गुंतवणुकीवर 6.8 टक्के व्याज मिळेल.
-  हा व्याजदर केवळ वार्षिक आधारावर उपलब्ध आहे आणि ही सर्व रक्कम केवळ मॅच्युरिटीनंतर मिळेल. 
- या योजनेत तुम्हाला वार्षिक किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
- या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एकट्याचे किंवा संयुक्त अशी दोन्ही खाती उघडू शकता. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोकांचा समावेश केला जाऊ शकतो.
- 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते देखील पालकांच्या देखरेखीखाली उघडता येते.


नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतून पैसे कसे काढणार?


जर तुम्हाला या खात्यातून 10 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी पैसे काढायचे असतील. तर, तुम्ही 3 वर्षांनंतर पैसे काढू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जही करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म (601-PW) भरावा लागणार. जर, तुमच्या खात्यात 1 लाखांपेक्षा कमी रक्कम जमा झाली असेल तर तुम्ही एकाच वेळी सर्व पैसे काढू शकता.