EPS Pension :  भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत जास्त पेन्शन मिळण्याची तारीख वाढवली आहे. ज्यांना वाढीव पेन्शन (Higher Pension) हवी आहे, त्यांनी 3 मार्च 2023 पर्यंतचा पर्याय निवडावा अशी सूचना पीएफ विभागाने दिली होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. अधिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 3 मे पर्यंत पर्याय निवडण्याची मुभा पीएफ विभागाने दिली आहे. एक सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर, 1 सप्टेंबर 2014 पासून तुम्ही EPF चे सदस्य असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. 


EPFO च्या माध्यमातून तुम्हाला नियमित पेन्शनचा लाभ मिळू शकतो. EPS च्या माध्यमातून जमा केलेल्या निधीतून ही पेन्शन दिली जाते. तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या जोडीदाराला पेन्शनची 50 टक्के रक्कम मिळते. तुमचा आणि जोडीदाराचा दुर्देवी मृत्यू झाल्यास तुमच्या मुलांची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत विधवा पेन्शन म्हणून देय रक्कमेच्या 25 टक्के रक्कम मिळते. 


मासिक पेन्शन कशी मोजली जाते? 


मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x ईपीएस खात्यातील योगदान वर्ष) / 70 


उदाहरण : एखाद्याचा मासिक पगार सरासरी 14 हजार असेल (यात बदल होतो, जो सरासरी केल्यावर सर्वात जास्त तो पकडायचा) आणि नोकरीचा कालावधी 20 वर्ष असेल तर दरमहा चार हजार रुपये पेन्शन मिळेल. 


दुसरं उदाहरण, जर कर्मचाऱ्याचा पेन्शनकरिता पात्र असलेला पगार 10 हजार रुपये इतका असेल आणि त्यांनी जर 18 वर्षे काम केलं तर (10,000 × 18) 70 = 2570 रुपये इतकं पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळेल.