PayTm share Price : शेअर बाजार सुरू असलेल्या घसरणीचा मोठा फटका अनेक कंपन्यांच्या शेअर्सना बसला आहे. शेअर बाजारात मोठ्या उत्साहाने लिस्ट झालेल्या 'पेटीएम'च्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. पेटीएम शेअरने आतापर्यंतचा आपला नीचांकी शेअर दर गाठला आहे. सोमवारी पेटीएमच्या शेअरचा दर 910 रुपयांपर्यंत आला. पेटीएमच्या शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदार होरपळले आहेत. 


सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पेटीएमची मूळ कंपनी  One97 Communications Ltd च्या शेअर दरात 5.27 टक्के घसरण दिसून आली. पेटीएमच्या शेअरने यावेळी 909 रुपयांचा दर गाठला होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक नीचांकी दर होता. शेअर बाजारात पेटीएम लिस्ट झाल्यानंतर सातत्याने शेअर दरात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे आयपीओत शेअर मिळालेल्या  आणि डिस्काउंट दरात शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. 


मागील आठवड्यात पेटीएमच्या शेअरचा दर 1000 रुपयांखाली आला होता. मागील एका महिन्यात पेटीएम शेअर दरात 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 


Macquarie चा अंदाज खरा ठरणार?


ब्रोकरेज फर्म Macquarie Securities India ने पेटीएमसाठी 900 रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केले होते. पेटीएमच्या शेअरच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे Macquarie Securities India ने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरणार असल्याची शक्यता आहे. या ब्रोकरेज फर्मने पहिल्यांदा पेटीएमच्या स्टॉकसाठी 1200 रुपयांखालील टार्गेट प्राइसचा अंदाज व्यक्त केला होता. 


गुंतवणुकदार होरपळले


पेटीएमची मूळ कंपनी One97 communicationsही शेअर बाजारात 18 नोव्हेंबर 2021 रोजी लिस्ट झाली होती. पेटीएमच्या आयपीओत प्रति शेअर 2150 इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. शेअर बाजारात कंपनी लिस्ट झाल्यानंतर मोठी घसरण दिसून आली. सातत्याने शेअर दरात घसरण होत आहे. आयपीओद्वारे शेअर्स मिळालेल्या गुंतवणुकदारांना आतापर्यंत 57 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागले आहे.