Paytm IPO: शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून असलेल्या PayTM IPO आज स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला. पेटीएमचा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीचे संस्थापक विजय शर्मा यांना अश्रू अनावर झाले नाही. मात्र, शेअर लिस्टिंगनंतर पेटीएमच्या शेअरने बाजारात व्यवसाय करण्यास सुरुवात केल्यानंतर आयपीओत शेअर मिळालेल्या गुंतवणुकदारांवर रडण्याची वेळ आली. 


गुंतवणुकदारांना सूचीबद्धतेत तोटा ( IPO Listing Loss)


मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात काही कंपन्या सूचीबद्ध झाल्या आहेत. त्यातील काही कंपन्या अपेक्षेप्रमाणे चढ्या दरावर सूचीबद्ध झाल्या नाहीत, मात्र, गुंतवणुकदारांच्या पदरी पेटीएम एवढी निराशा हाती आली नाही. शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर काही तासांमध्येच गुंतवणुकदारांना 38 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. 


शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी पेटीएमचे बाजार मूल्य IPO किंमतीनुसार 1.39 लाख कोटी रुपये होते आणि आज जेव्हा ते सूचीबद्ध झाले तेव्हा त्याचे मार्केट कॅप 101,182 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच थेट मार्केट कॅपमध्ये 38,000 कोटी रुपयांची घट झाली. 


पेटीएमचा शेअर सूचीबद्ध झाल्याच्या पहिल्याच दिवशी लोअर सर्किट लागला. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा शेअरच्या दरात 27.40 टक्के घसरण झाली आणि 1560.80 रुपयांवर बंद झाला. आयपीओतील शेअर दर 2150 रुपये होता. त्यात 590 रुपयांची घट झाली. 


ब्रोकरेज हाउसेसकडून 'टार्गेट प्राइस' मध्ये घट


पेटीएमच्या शेअर दरात सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्ह नाहीत. काही ब्रोकरेज फर्म, गुंतवणूक संस्थांकडून या शेअरमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परदेशातील ब्रोकरेज संस्था Macquarie ने पेटीएमच्या 'टार्गेट प्राइस'मध्ये घट केली असून 1200 रुपये इतकी केली आहे. नफा कमावणे पेटीएमसाठी मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. 


शेअर बाजारात पेटीएम सूचीबद्ध झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पेटीएमने आपल्या आयपीओची किंमत अधिकच ठेवली होती. त्यामुळे गुंतवणुकदारांनी फारसा उत्साह दाखवला नव्हता, असे म्हटले जात आहे. 


छोट्या गुंतवणुकदारांनी काय करावे?


शेअर बाजारातून निधी उभारण्यासाठी फिनटेक कंपन्या प्रयत्नशील आहेत. काहींनी आयपीओ आणले आहेत. लहान गुंतवणुकदारांपासून अनेक संस्थात्मक गुंतवणुकदार आयपीओत बराच पैसा गुंतवत आहेत. आयपीओतून कमी वेळत अधिक नफा कमावण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. मात्र, लहान गुंतवणुकदारांनी सावधपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी त्याच्या व्यवसायाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. 


पेटीएमच्या आयपीओमुळे गुंतवणुकादारांना धडा


पेटीएमच्या आयपीओमुळे गुंतवणुकदारांसह मोठ्या कंपन्यांचे प्रमोटर, मर्चंट बँकर यांनाही धडा मिळाला आहे. उच्च दरावर आयपीओतील शेअर दरावर प्राइसब्रॅण्ड तयार करतात. कोणताही गुंतवणुकदार चांगला परतावा असल्यास गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणार. पेटीएमटच्या आयपीओमुळे भविष्यातील आयपीओला मिळणाऱ्या प्रतिसादाला झटका बसण्याची शक्यता आहे.  


संबंधित वृत्त: 


PayTM पेटीएमच्या शेअर दरात घसरण का? 'ही' आहेत कारणे
Paytm IPO Listing : पेटीएमच्या शेअर्सची संथ सुरुवात, गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्यासाठी पाहावी लागणार वाट


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha