OPEC Crude Oil: तेल उत्पादक देशांनी घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याच्या परिणांमी भारतात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या 'ओपेक प्लस'ने (OPEC Plus) तेल उत्पादन प्रति दिन 20 लाख बॅरलपर्यंत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोना महासाथीच्या सुरुवातीनंतरची ही सर्वात मोठी कपात आहे. प्रमुख तेल उत्पादक देशांच्या संघटनेत सौदी अरेबिया आणि रशिया या प्रमुख तेल उत्पादक देशांचा समावेश आहे. 


ओपेक आणि सहकारी देशांनी प्रति दिन कच्च्या तेलाच्या उत्पादनात 20 लाख बॅरल कपातीचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर असलेल्या कच्च्या तेलाच्या मागणीतील याचे प्रमाण जवळपास दोन टक्के इतके आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात नोव्हेंबरपासून कपात होणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये ओपेकची बैठक होणार आहे. या बैठकीत तेल उत्पादनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण दिसून आली होती. चीनमधून कमी झालेली कच्च्या तेलाची मागणी आणि मंदीचे सावट याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर घसरले होते. क्रूड ऑईलने 80 डॉलर प्रति बॅरल इतका दर गाठला होता. त्यानंतर मागणी आणि पुरवठा यातील समतोल राखत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ओपेक'कडून कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 


तीन आठवड्यातील उच्चांकी दर


'ओपेक प्लस' कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करणार असल्याच्या शक्यतेने मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली. त्यानंतर ओपेक प्लसने उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात उसळण दिसून आली. कच्च्या तेलाचा दर 95 डॉलर प्रति बॅरल इतका झाला. 


ओपेकने काय म्हटले?


ओेपेकने म्हटले की, कच्च्या तेलाच्या दरात होणारी घसरण थांबवण्यासाठी तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे होणाऱ्या संभाव्य बदलाचेही आकलन करण्यात आले. बुधवारी ओपेक सदस्य देशांमधील ऊर्जा मंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये उत्पादन कपातीचा निर्णय घेण्यात आला.