OPEC  On Crude Oil : इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'ने कच्च्या तेलाबाबत घेतलेल्या निर्णयाचा फायदा अनेक देशांना होणार आहे. ओपेक आणि रशियासह इतर सहकारी देशांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा अधिक पुरवठा होणार आहे. त्याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 


भारतात इंधन दर स्वस्त कसे होणार?


ओपेक देशांच्या या निर्णयामुळे जगात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढणार आहे. त्याच्या परिणामी कच्च्या तेलाच्या किमती कमी होणार आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्यास भारतासह अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्कीच कमी होतील असे म्हटले जात आहे. इंधन दर कमी झाल्यास महागाईवर देखील बरेच नियंत्रण मिळवण्यास यश येईल. 


जुलै-ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन किती होणार?


ओपेक आणि सहकारी देशांनी (ओपेक प्लस) कोरोना महासाथीच्या काळात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केली होती. त्यानंतर आता कच्च्या तेलाचे उत्पादन टप्प्या टप्प्याने वाढवण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून दररोज 4,32,000  बॅरलचे उत्पादन करण्यात येत आहे. आता यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला  असून  6,48,000 बॅरल प्रति दिन उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


काय होणार परिणाम?


जगभरात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने महागाईचा भडका उडत आहे. अमेरिकेसह जगभरात इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्यास इंधन दर आणखी कमी होतील अशी शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: