Cardless Cash Withdrawal: लवकरच तुम्ही एटीएम-डेबिट कार्डशिवाय पैसे काढू शकाल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटरना त्यांच्या एटीएम मशीनवर इंटरऑपरेबल कार्ड-लेस कॅश काढण्याची सुविधा देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कॅशलेस व्यवहार करण्यासाठी UPI द्वारे ग्राहकांची माहिती तपासली जाईल. एटीएम नेटवर्कच्या सेटलमेंटसाठी नॅशनल फायनान्शियल स्विचचा वापर केला जाईल. कार्डलेस रोख पैसे काढण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ला सर्व बँका आणि ATM सह युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) करण्यास सांगण्यात आले आहे. कार्डमधून पैसे काढण्याची मर्यादा सध्या एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेइतकीच राहील. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, जर कोणत्याही व्यवहारामुळे ग्राहकाचे नुकसान झाले, तर नुकसान भरपाईचे सध्याचे नियम वैध असतील.
यापूर्वी 8 एप्रिल 2022 रोजी चलनविषयक धोरण जाहीर करताना RBI ने देशातील सर्व बँकांच्या ATM मध्ये UPI सुविधेद्वारे कार्डलेस रोख पैसे काढण्याचा प्रस्ताव दिला होता. सध्या फक्त काही बँका एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्याची परवानगी देतात. पण RBI च्या आदेशानंतर UPI वापरून आता सर्व बँका आणि ATM मध्ये कॅशलेस पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले आहेत की, ही कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा UPI द्वारे प्रदान केली जाईल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कार्डलेस रोख पैसे काढण्याच्या सुविधेद्वारे व्यवहार सुलभ होतील, तसेच डेबिट कार्ड बाळगण्याचीही गरज नाही. ज्यामुळे डेबिट कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंगला आळा घालण्यास मदत होईल.
डेबिट एटीएम कार्डची आवश्यकता नाही
या सुविधेद्वारे ग्राहक त्याच्या मोबाइल फोनचा वापर करून BHIM, Paytm आणि Googlepay सारख्या UPI अॅप्सद्वारे पैसे काढू शकणार आहेत. UPI आधारित ATM मध्ये डेबिट कार्ड स्वाइप करण्याची गरज नाही. ग्राहकाला स्क्रीनवरील कोड स्कॅन करावा लागेल आणि मोबाईलद्वारे पैसे काढण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर एटीएममधून पैसे काढले जाऊ शकतात.