Lord Laxmi and Ganesh on Currency Notes: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वी चलनी नोटांवर लक्ष्मी देवी (Godess Laxmi) आणि गणपतीचे (Ganesh) चित्र छापण्याची मागणी केली होती. त्यावरून राजकारणही झाले होते. केंद्र सरकारने ही मागणी पूर्ण करावी असा मतप्रवाह सुरू होता. त्याशिवाय चलनी नोटांवर स्वातंत्र्य सैनिकांपासून ते विविध व्यक्तींची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. यावर संसदेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चलनी नोटांवरून (Currency Note) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची प्रतिमा हटवण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. 


लोकसभेत चलनी नोटेवरील प्रतिमेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्र सरकारकडे लक्ष्मी देवी, श्री गणेश यांच्यासह इतर फोटो लावण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात आली होती का, सरकारने या मागणीबाबत काय विचार केला आदी प्रश्न विचारण्यात आले होते. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सांगितले की, सरकारकडे देवी-देवतांसह प्रतिष्ठित व्यक्ती, प्राण्यांचे फोटो चलनी नोटांवर छापण्याबाबत मागणी करण्यात आली होती. आरबीआय कायदा 1934 मधील कलम 25 अंतर्गत, बँक नोट डिझाइन, फॉर्म आणि सामग्रीच्या वापराबाबत आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच बदल शक्य आहेत असे त्यांनी म्हटले. महात्मा गांधी यांचा चलनी नोटांवरून चलनी फोटो वगळण्यात येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


पंकज चौधरी यांनी सांगितले की 6 जून 2022 रोजी आरबीआयने  वृत्तपत्र निवेदन जारी करत सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव नाही. त्यावेळी आरबीआयने महात्मा गांधी यांचा फोटो हटवण्यात येणार असल्याचे वृत्तही फेटाळून लावले होते. 






अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेत रविंद्रनाथ टागोर आणि देशाचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा असलेल्या नव्या सीरिजच्या नोटा छापण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आरबीआयने हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले.  


दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी चलनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा छापण्याची मागणी केली होती.