Nehal Modi Arrested वॉशिंग्टन : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती भारत सरकारला दिली आहे. नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला शुक्रवारी (4 जुलै) रोजी अमेरिकेत अटक करण्यात आली. ही अटकेची कारवाई भारतातील दोन मोठ्या यंत्रणा ईडी आणि सीबीआयकडून करण्यात आलेल्या एक्स्ट्राडिशन रिक्वेस्टच्या आधारावर करण्यात आली आहे.
भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा समावेश होतो. त्या घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून नेहाल मोदीचा शोध घेतला जात होता. नेहाल मोदी यानं त्याचा उद्योगपती भाऊ नीरव मोदीसाठी काळापैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं समोर आलं होतं. ईडी आणि सीबीआय चौकशीत हे दिसून आलं की नेहाल मोदीनं काही बेनामी कंपन्यांच्या मार्फत मोठी रक्कम विदेशात पाठवली होती. फसवणूक करुन कमावलेल्या पैशांना ट्रॅक बाहेर ठेवण्यामध्ये नेहाल मोदी सहभागी होता.
प्रत्यार्पणावर 17 जुलै रोजी सुनावणी
नेहाल मोदीच्या प्रत्यार्पणावर आता पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. त्या दिवशी अमेरिकेच्या कोर्टात स्टेटस कॉन्फरन्स होणार आहे. नेहाल मोदी जामीन अर्ज देखील देण्याची शक्यता आहे. त्याला अमेरिकेच्या सरकारचे वकील विरोध करतील. भारत सरकारचा प्रयत्न नेहाल मोदीला तातडीनं भारतात आणण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर त्याच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवला जाईल.
अमेरिकेच्या प्रशासनाच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार प्रत्यार्पणाची कारवाई दोन आरोपांच्या आधारावर केली जात आहे. पहिला आरोप मनी लाँड्रिंगचा आहे. जो मनी लाँड्रिंग कायदा 2002 च्या कलम 3 नुसार दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोप हा भारतीय दंड संहितेच्या कलम 120 ब आणि 201 नुसार करण्यात आलेला आहे.