Rule Changes from 1st December : नोव्हेंबर महिना संपायला आता काही तासच शिल्लक आहेत. त्यानंतर डिसेंबर महिना सुरु होईल. 1 डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांमध्ये HDFC बँकेच्या Regalia क्रेडिट कार्डच्या फायद्यांशी संबंधित नियमांचा समावेश आहे. याशिवाय 1 डिसेंबर 2023 पासून सिम कार्डसाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत. एलपीजी गॅसच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. 


एचडीएफसी बँक कार्ड रेगलियासाठी नवीन नियम


HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. 1 डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. आता रेगेलिया क्रेडिट कार्डधारक केवळ खर्चाच्या आधारावर लाउंजमध्ये प्रवेश करू शकणार आहे. लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी, क्रेडिट कार्ड युजर्सना एका कॅलेंडर तिमाहीत (जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर) रुपये 1 लाख किंवा त्याहून अधिक खर्च करावे लागतील. म्हणजेच, कोणत्याही तिमाहीत 1 लाख रुपयांचे व्यवहार केल्यानंतरच तुम्ही लाउंज वापरण्यास सक्षम असाल. स्मार्ट बाय पेज आणि लाउंज बेनिफिट्स पेजला भेट देऊन ग्राहकाला लाउंज व्हाउचरचा दावा करावा लागेल. तरच तो त्याचा लाभ घेऊ शकेल. बँकेने सांगितले की,  जेव्हा ग्राहक खर्चाबाबतचा नियम पूर्ण करेल तेव्हाच त्याला कार्डवर लाउंज प्रवेशाचा लाभ घेता येईल. तुम्ही एका तिमाहीत फक्त दोनदा लाउंज लाभ घेऊ शकाल. लाउंज प्रवेशाच्या वेळी 2 रुपये व्यवहार शुल्क आकारले जाईल. मास्टरकार्डच्या ग्राहकांच्या कार्डमधून 25 रुपये कापले जातील पण नंतर ते परत केले जातील. 


SIM कार्डसाठी नवीन नियम


केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. हे नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर, एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार आहेत. नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विक्रेत्यांना नोंदणी करण्यापूर्वी आणि सिस्टममध्ये सामील होण्यापूर्वी केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.


एलपीजी किंमत ठरणार


एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ठरतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन किमती जाहीर केल्या जातात. या काळात मागणी वाढल्याने लग्नाच्या मोसमात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तर, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात इंधन कंपन्यांकडून दिलासा मिळणार का, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.