New India Co-operative Bank : न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक (New India Co-operative Bank) घोटाळा प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पान आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी ईओडब्ल्यूने काल अभिमन्यूला अटक केली. अभिमन्यू हे बँकेचे माजी सीईओ होते.

गुंतवणूकदार हतबल

30 पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच  या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँक खातेदार आणि नागरिक हतबल झाले असून आरबीआयला देखील दोष देत आहेत. दरम्यान,  न्यू इंडिया को बँकेचे अनेक राजकीय व्यक्ती ही कर्जदार आहेत. अनेक मोठ्या रकमा कर्ज म्हणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बँकेला बुडवण्यात नक्की कोण कोण जबाबदार आहे हे तपासातूनच समोर येईल. मात्र, यात सर्वसामान्य ठेवीदार ज्यांची आयुष्यभराची कमाई ठेवली होती, तो मात्र हतबल होऊन रोज बँकेच्या दारात उभा राहतोय ही ह्रदयस्पर्शी घटना आहे. 

हितेश मेहतांवर 122 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याल अटक करण्यात आली आहे. हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता, त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी आणि टीडीएसबाबत आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. त्याने प्रभादेवी शाखेतून 112 करोड तर गोरेगाव शाखेतून 10 करोड रुपये गायब केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत बँकेच्यावतीने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेहता बरोबर आणखी ही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.  

ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.  रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात या बँकेवर निर्बंध लादले होते आणि ठेवीदारांना पैसे काढण्यापासून बंदी घातली होती. मात्र, आता या निर्णयात काही शिथिलता देण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे. यामुळं ग्राहकांना आपत्कालिन स्थितीत पैसे मिळतील. 

 

महत्वाच्या बातम्या:

2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी