Narayana and sudha Murthy wedding: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती (sudha Murthy) हे देशातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहेत. परंतू, ते त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळं जास्त ओळखले जातात. अलीकडेच नारायण मुर्ती आणि सुधा मूर्ती यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. या जोडप्याने सांगितले की त्यांनी त्यांच्या लग्नात फक्त 800 रुपये खर्च केले होते.


सुधा मूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी एका मोठ्या संयुक्त कुटुंबातील आहे. जिथे कुटुंबात 75 ते 80 सदस्य होते. अशा परिस्थितीत सुधा मूर्ती यांच्या वडिलांना लग्नासाठी 200 ते 300 नातेवाईकांना बोलवायचे होते, पण सुधा मूर्ती यांना भव्य लग्नाऐवजी अतिशय साधे लग्न हवे होते.


वडील नाखूष 


सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचा विवाह 1978 साली झाला होता. दोघांनाही मोठ्या थाटामाटात लग्न न करता साधेपणाने लग्न करायचे होते. यासाठी त्यांनी लग्नासाठी 800 रुपये बजेट ठरवले होत. मात्र, सुधा मूर्तीचे वडील यामुळं नाराज होते. कुटुंबातील पहिल्या मुलीचे हे लग्न असून ते थाटामाटात करायचे असल्याचे त्यांनी सांगितले, पण शेवटी दोघांनीही साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत या जोडप्याने बंगळुरुमध्ये सात फेरे घेतले.


लग्नात फक्त 800 रुपये खर्च


या लग्नासाठी दोघांनी मिळून एकूण 800 रुपये खर्च केल्याचे सुधा मूर्ती यांनी सांगितले. त्यापैकी 400 रुपये नारायण मूर्ती आणि 400 रुपये सुधा मूर्ती यांनी खर्च केले. दोघांनीही आपले लग्न अगदी साधेपणाने ठेवले होते. नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांना साडी किंवा मंगळसूत्र यापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला होता, त्यामुळे त्यांनी 300 रुपयांना नवीन मंगळसूत्र खरेदी केले. सुधा मूर्ती या मुलाखतीत म्हणाल्या की, लग्न हे केवळ एका दिवसाचे बंधन नसते तर ते आयुष्यभराचे नाते असते. अशा परिस्थितीत आपण अधिक पैसे खर्च करण्याऐवजी एकमेकांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.


नारायण मूर्ती इतके कोटींचे मालक 


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव येते. फोर्ब्सच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 4.4 अब्ज डॉलर्स आहे. नारायण आणि सुधा मूर्ती यांची एकूण संपत्ती 37,465 कोटी रुपये आहे. सुधा मूर्ती इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


माझी शिफ्ट संपली, आता मी निघतोय... नारायण मूर्तींच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले तरुण