मुंबई : मुंबई, उपनगरांत हाऊसिंग सोसायट्यांच्या (Housing Society) पुनर्विकास करणे म्हणजे फार जिकरीचं काम. या घरांचा पुनर्विकास करायचा म्हणजे एखाद्या बिल्डरला हाताशी धरावं लागतं. त्यानंतर हे बिल्डर्स त्यांच्या सोईनुसार नफेखोरीला केंद्रस्थानी ठेवून पुनर्विकास करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांची निराशा होते. मात्र मुलुंडमध्ये लोकांनी एक भन्नाट प्रयोग पुर्नत्त्वास नेला आहे. कोणत्याही बिल्डरला हाताशी न धरता या लोकांनी स्वत:च घरांचा पुनर्विकास केला आहे. ज्यामुळे त्यांना अगोदरपेक्षा अधिक मोठी घरं मिळाली आहेत. सोबतच घरांच्या पुनर्विकासासाठी जेवढा पैसा लावला होता, तो संपूर्ण पैसा या लोकांनी अतिरिक्त घरं विकून परत मिळवला आहे. मुलुंडमधील या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
पूर्वरंग हाऊसिंग सोसायटीची कमाल
मुलुंडमधील पूर्वरंग कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीने स्वत:च्या घरांचा स्वत:च पुनर्विकास केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प करताना त्यांनी कसलेही कर्ज घेतलेले नाही. तसेच कोणत्या बिल्डरलाही कंत्राट दिलेले नाही. एकूण 56 कुटुंबांनी सतत सात वर्षे मेहनत घेऊन कोणतेही कर्ज न घेता एकूण 23 मजली इमारत उभी केली आहे. या 56 कुटुंबांनी एकदिलाने काम करून उभे केले आहेत. स्वत: कंत्राटदार नेमून हवी तशी इमारत उभी केली आहे. याच कारणामुळे कोणतेही कर्ज न घेता स्वत:च पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास जाणारा हा पहिला प्रयोग ठरला आहे.
आता आता मिळाले 1015 स्क्वेअर फुटांचे घर
पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद महाडिक यांनी त्यांच्या या अभिनव प्रयोगाबाबत अधिक माहिती दिली आहे. या सोसायटीचे लोक कधीकाळी 390 स्क्वेअर फुटाच्या घरात राहायचे. आता या पूनर्विकासातून या कुटंबांना तब्बल 1015 स्क्वेअर फुटाचे तीन बीएचके घर मिळाले आहे. कोणत्याही विकासकाची मदत न घेता स्वत: हाऊसिंग सोसायटीनेच घरांचा पुनर्विकास करावा, अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर प्रभू यांनी मांडली होती. मंगळवारी त्यांच्याच हाताने सोसायटीतील कुटुंबांना पुनर्विकास झालेल्या नव्या घरांच्या प्रतिकात्मक चाव्या देण्यात आल्या.
अतिरिक्त घरं विकून खर्च झालेला पैसा परत मिळवला
पूर्वरंग हाऊसिंग सोसायटीने पुनर्विकास केलेल्या इमारतीत आता एकूण 118 फ्लॅट्स आहेत. यातील 56 घरे ही सोसायटीतील सदस्य कुटुंबाना देण्यात आले आहेत. तर उर्वरित फ्लॅट्स हे विकण्यात आले आहेत. या लोकांनी एकूण 62 घरांपैकी ५७ घरं विकली आहेत. या घरांच्या विक्रीतून एकूण 85 कोटी रुपये मिलाले आहेत. या सोसायटीतील कुटुंबानी ही नवी इमारत उभारण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले होते, तेवढे पैसे ही 57 घरं विकून परत मिळाली आहेत.
मुलुंडच्या या अभिनव प्रकल्पाची सगळीकडे चर्चा
दरम्यान, कोणत्याही विकासकाची मदत न घेता, कोणतेही कर्ज न घेता सोसायटीचा पुनर्विकास केल्यामुळे या कुटुंबाची सर्वत्र वाहवा होत आहे. अगोदर 390 स्क्वेअर फुटात राहणारी ही माणसं आता थेट एक हजार स्वेअर फुटाच्या घरात राहात आहेत. त्यांच्या या अभिनव प्रकल्पांची सगळीकडे चर्चा होत आहे.
हेही वाचा :
एलॉन मस्क यांची भारताकडे पाठ, आता थेट चीनच्या दौऱ्यावर; टेस्ला कारविषयी होणार महत्त्वाची चर्चा!
घरासमोर 50 रोल्स रॉयस, 1000 कोटीच्या हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर, भारताचे पहिले अब्जाधीश कोण होते?