परभणी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. या आवाहनानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई केवायसीसाठी आवश्यक असलेला ओटीपी येत नसल्यानं लाडक्या बहिणींसमोर अडचणी
Ladki Bahin EKYC Problems : लाडकी बहीण ई- केवायसी करताना अडचणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांना सातत्यानं लाभ मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार अनेकांनी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलला भेट देऊन ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधार क्रमांक नोंदवल्यानंतर जो ओटीपी येणं आवश्यक आहे तो येत नसल्यानं लाडक्या बहिणींसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत.
ई- केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्यावा लागणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा स्वत:चा आधार क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पुढं नेल्यानंतर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरण करावं लागेल. आधार क्रमांक नोंदवल्यानंतर पती किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी क्रमांक ई-केवायसीसाठी नोंदवावा लागेल. यानंतर पात्र लाभार्थ्यानं घोषणापत्र मान्य असल्याचं नोंदवावं लागेल. त्यामध्ये त्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत नसल्याचं आणि कुटुंबातील केवळ 2 व्यक्ती लाभ घेत असल्याचं घोषणापत्राद्वारे जाहीर करावं लागेल.
सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल ई-केवायसी संदर्भातील घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 14 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे.