मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थी महिलांना मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. लाडक्या बहि‍णींना ई- केवायसी करण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. आता महिला व बालविकास विभागानं ई- केवायसी करताना काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी एक संधी दिली आहे. याशिवाय एकल महिलांनी ई- केवायसी प्रक्रिया कशी पार पाडावी याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

Ladki Bahin E-KYC : ई-केवायसीत सुधारणेची एक संधी    

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया 1 कोटी 74 लाख महिलांनी पूर्ण केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. आता महिला व बालविकास विभागानं ज्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ती प्रक्रिया पूर्ण करताना पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी योजनेच्या वेब पोर्टलवर एक अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना काही चुका झाल्या असतील तर त्यांनी त्या दुरुस्ती करताना काळजीपूर्वक माहिती भरावी. 

वडील/ पती हयात नसलेल्या महिला आणि एकल महिलांनी ई-केवायसी कशी करावी? 

महिला व बालविकास विभागानं ई-केवायसी प्रक्रिया सुरु केली होती तेव्हा ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत अथवा एकल महिलांनी ई केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. कारण ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वडील आणि पतीच्या आधार क्रमांकाचं ऑथेंटिकेशन करणं अनिवार्य करण्यात आलं होतं. आता,  महिला व बाल विकास विभागानं याबाबत निर्णय घेतला आहे. वडील, पती हयात नसणाऱ्या महिलांनी पती अथवा वडील यांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकांकडे  31 डिसेंबर पर्यंत जमा करायची आहे. घटस्फोटित महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालय आदेशाची प्रत अंगणवाडी सेविकांकडे द्यावी. ही प्रक्रिया ऑफलाईन असेल. मात्र, अशा महिलांना स्वताचा आधार क्रमांक पोर्टलवर नोंदवून स्वत: ची ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी.

Continues below advertisement

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे.