दहीहंडीचा थरार संपला की, आम्हा मंडळींना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांमधून बाहेर पडून यंदा दहीहंडी जोशात पार पडली आणि साऱ्यांनाच ओढ लागली ती उत्सवांच्या राजाची. 


अर्थात गणेशोत्सवाची. ठिकठिकाणी एव्हाना मूर्तिकारांची लगबग, मंडप डेकोरेटर्सची तयारी, मखर तयार करणं असं वातावरण असतं. गिरगावसारख्या चाळसंस्कृती जपणाऱ्या (जी टॉवरनिर्मितीमुळे काळानुरुप काहीशी कमी होत चाललीय) भागात जेव्हा तुम्ही राहत असता, तेव्हा तर हे वातावरण तुमच्या नसानसात भिनलेलं असतं. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात साजरा होत असतो, पण तो तुमच्या शरीरात भिनलेला असतो. मग गणेशोत्सवाच्या मीटिंग्ज असोत, मखर सजावटीची चर्चा असो, कार्यक्रमांची आखणी असो, किंवा मग अगदी अलिकडे सुरु झालेला पाटपूजन यासारखा कार्यक्रम.


दहीहंडी झाल्यानंतर मंडप बांधणी होते आणि आमचा उत्सव सुरु. म्हणजे घरुन येता जाता गणपतीच्या स्टेजवर काही वेळ तरी ठाण मांडणं. हा नियमित कार्यक्रम. त्याच वेळी मोठ्ठाल्या फॅनचा वारा अंगावर घेत गप्पा करण्याचा आनंद काही औरच. त्यात जरी कुणी सोबतीला नसलं तरीही एकटेच बसलात तरीही तुमचा संवाद सुरु असतो. खरं, तेव्हा तुम्हाला जास्त बोलता येतं स्वत:शीच. तो मंडप, ते स्टेज, तो गणेशोत्सव मंडळाचा बॅनर. तो फॅन, अगदी तो जिनाही, तुमच्याशी बोलू लागतो. इतकी वर्षे चाळीतलं हे वातावरण जगल्यावर या वस्तुंशी, या वास्तुशी तुमचं असं एक घट्ट नातं तयार होतं. ज्या स्टेजवरच्या वक्तृत्व, वेशभूषासारख्या स्पर्धांमध्ये तुम्ही पहिलं पाऊल ठेवता, त्याच स्टेजवर काळानुरुप, वयानुरुप तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते या नात्याने ती स्पर्धा आयोजन करत असता. तर काही वेळा अगदी नुसतं प्रेक्षकांमध्ये बसून त्या क्षणांचा आनंद घेत असता. मग कधी भोकाड पसरणाऱ्या एका छोटुकल्याचा चेहरा आठवतो तर, कधी पहिल्याच फटक्यात खणखणीत परफॉर्मन्स देणाऱ्या एखाद्याचाही चेहरा समोरुन तरळून जातो. तिथे परफॉर्मन्स देण्यापेक्षा जास्त महत्त्व त्या वयात स्टेजवर जाण्याचं धैर्य दाखवण्यात असतं.


दिवस सरता सरता स्टेजवरच सगळ्यांनी एकत्र येत नाश्ता करणं. मग कधी भेळपुरी तर कधी सँडविचसारखा मेन्यू. तर कधी स्नेहसंमेलनातलं स्नेहभोजन. तिथे पदार्थ मॅटर करत नाही, गणेशोत्सवात एकत्र येऊन स्टेजवर बसून तुम्ही जे पदार्थ खाता त्याची चव जिभेवर तरळत असते. आमच्या गणेशोत्सव मंडळात स्नेहसंमेलनासारखा सोहळा दरवर्षी होत असतो. ते क्षणही मग मनात दाटी करतात. फक्त शरीराने चाळ सोडून गेलेले, पण मनाने चाळीतच पक्क घरं केलेले माजी रहिवासी हक्काने, आपुलकीने या दिवशी इथे येतात. आम्हाला मनापासून भेटतात. स्नेहसंमेलनाचे दोन तास प्रचंड भारलेलं वातावरण आम्ही जगतो. तेव्हा जेवण नाही मिळालं तरी पोट भरतं, सर्वांना भेटून. त्यांच्या सहवासाने.


त्याच स्टेजवर मग बक्षीस समारंभाची लगबग. पूर्वतयारी आपण करत असतो. त्याच वेळी मंडपाच्या आवारात, म्हणजे चौकात बसून महाआरतीचे सूर आळवणं हा सुखसोहळा आम्ही गेले कित्येक वर्षे अनुभवतोय, तेही मनाच्या पटलावरुन सरकून जातं.


स्टेजलगत असलेला जिनाही खूप मनाजवळचा आहे. म्हणजे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, स्पर्धांमध्ये वक्तृत्वसारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून ते बक्षीस समारंभासाठीही याच पायऱ्या चढून स्टेजवर जाणं येणं व्हायचं. याच स्टेजने पहिल्यांदा आपल्यातल्या कलागुणांना वाव दिलाय. त्या स्टेजसमोर नतमस्तक व्हावंच लागेल.


पुढे मीडियासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठीही याच स्टेजलगतच्या पायऱ्यांनी वाट दाखवलीय, दिशा दाखवलीय. या पायऱ्यांचं ऋण माझ्यासाठी खूप मोठं आहे.


गणेशोत्सव मंडळाचा नोटीस बोर्डही तुम्ही एकटं बसलेले असताना खुणावतो.


नोटीस बोर्डवर झळकणारी गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची यादी, बाप्पांच्या चरणी फुलांची-दुर्वांची वाडी भरणाऱ्यांची यादी, कार्यक्रम पत्रिका, मीटिंगची नोटीस हे सारं इतकी वर्ष जगतोय, अनुभवतोय...तरीही एकटं बसल्यावर हे क्षण मनात दाटी करतातच. बाप्पांचा मंडप ही अशी चैतन्यदायी, ऊर्जादायी वास्तु आहे, जिथे तुम्ही कधी एकटे बसलेले असलात तरी एकाकी नसता. प्रचंड समृद्ध कऱणाऱ्या क्षणांची, अनुभवांची तुम्हाला सोबत असते.


तेव्हाच अगदी मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिशाळेत पुन्हा पुन्हा दिलेल्या भेटीही आठवतात. म्हणजे त्या मूर्तिकलेतील आपल्याला काहीही कळत नसलं तरीही नुसतं जाऊन दिवसागणिक साकारत आणि आकारत जाणारा बाप्पा पाहूनच मन विलक्षण आनंदून जातं. या मूर्तिकार मंडळींची तासन् तास मेहनत, त्यांची मूर्ती साकारतानाची एकाग्रता, रात्र-रात्र होणारी जागरणं याला खरंच वंदन करावं लागेल.


तुम्ही कधी गणेशोत्सवाच्या कार्यकारी मंडळाचा भाग असता तर, कधी नसता. पण, तुम्ही कायम उत्सवाचा, उत्साहाचा भाग असता, नव्हे असायलाच हवं. या गणेशोत्सवात कार्यकर्ता घडतो.  उत्तम टीम मॅनेजमेंटचं गमक तुम्हाला इथे समजतं.


गणेशोत्सवाचे सर्वच दिवस मंतरलेले असतात. मंत्रोच्चाराचेही असतात आणि मंत्रमुग्ध करणारेही. पण, त्याआधीच्या काही दिवसांमध्ये स्टेजवर बसून तुम्ही जेव्हा स्वत:शीच बोलता, तेव्हा अशा अनेक क्षणांचा दरवळ तुमच्या आजूबाजूला असतो. जो तुम्हाला सुगंधित उदबत्ती, कापूर, धूप यासारखाच मोहून टाकतो.


त्यात जेव्हा आम्ही वास्तव्य करत असलेल्या काही चाळींना जेव्हा पुनर्विकासाचे वेध लागलेले असतात, तेव्हा तर हे मन अधिक हळवं होतं. पुढचा गणेशोत्सव चाळीमध्ये की, थेट नवीन इमारतीत. अशा विचाराने मनात कालवाकालव होते. चाळींचे टॉवर होणं ही काळाची गरज आहे. असं असलं तरीही चाळीतल्या उत्सवांची मजा, गोडी काही औरच. टॉवरमध्ये ती जशीच्या तशी पुन्हा अनुभवता येईल का? या विचाराने मन गलबलून येतं.


गेल्या दोन वर्षांमधली आरोग्याची नकारात्मकता बाजूला सारत यंदा बाप्पांच्या या उत्सवाची ओढ मनाला लागलीय. मन पुन्हा एकदा रितं केलंय, या उत्सवातले क्षण मनात साठवून ठेवण्यासाठी. कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त अनमोल खजिना त्यात जपून ठेवायचाय. तीच आयुष्य समृद्ध करणारी संपत्ती आहे.