मुंबई :  भारतातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची आज आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून (Reliance) वेगळी झालेली कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी (Jio Financial Services) आज शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) झाली. मात्र, पहिल्याच दिवशी कंपनीने आपल्या 36 लाख गुंतवणूकदारांना निराश केले. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले.


आज बाजारात लिस्ट होताना जिओ फायनान्शिअल कंपनीचा शेअर बीएसईवर 265 रुपयांवर लिस्ट झाला. तर, एनएसईवर 262 रुपयांवर लिस्ट झाला. मात्र, शेअर लिस्ट झाल्यानंतर लोअर सर्किट लागले. 


जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर दरात पाच टक्क्यांची घसरण झाली. त्यानंतर जेएफएसच्या शेअर दराला 251.75 रुपयांवर लोअर सर्किट लागले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा व्यवहार सुरू झाला. त्यावेळी शेअर सावरेल असा अंदाज होता. मात्र, शेअर दरात घसरण कायम राहिली. आज दिवसभरातील व्यवहार थांबला तेव्हा शेअर दर 248.90 रुपयांवर स्थिरावला. 


दिवसभरातील व्यवहाराअंती जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजार भांडवल मुंबई शेअर बाजारावर एक लाख 59 हजार 944 कोटींवर पोहचले. तर, राष्ट्रीय शेअर बाजारावर एक लाख 58 हजार 133 कोटी इतके नोंदवण्यात आले. 


घसरण का?


रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळे झाल्यानंतर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांना Jio Financial चे शेअर मिळाले आहेत, त्यांनी Jio Fin चे शेअर्स विकले आहेत. एका अंदाजानुसार म्युच्युअल फंडांनी 145 दशलक्ष शेअर्स विकले आहेत. याशिवाय एक्सचेंज ट्रेडेड फंड्सकडूनही (ईटीएफ फंड्स) जिओ फिनचे शेअर्सची विक्री झाली आहे. 


जिओ फायनान्शिअलच्या स्टॉकमधील ही विक्री पुढील काही दिवस सुरू राहू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. मार्केटमधील अनेक ब्रोकरेज हाऊसेसने जिओ फिनच्या शेअर्सचे मूल्य 180 ते 190 रुपये असल्याचे मानले होते. परंतु ते त्यांच्या अंदाजापेक्षा अधिकच्या रक्कमेवर व्यवहार करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. 


जिओ फायनान्शियलचे बिझनेस मॉडेल काय?


जिओ फायनान्शियलच्या बिझनेस मॉडेलबाबत सध्या बाजारासमोर एक अस्पष्ट चित्र आहे.  28 ऑगस्ट 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसबाबत आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करण्यासाठी जिओ फायनान्शिअलने ब्लॅकरॉकशी करार केला आहे. आगामी काळात, कंपनी व्यापारी-ग्राहक कर्ज, विमा, पेमेंट व्यवसाय आणि डिजिटल ब्रोकिंग व्यवसायातही उतरू शकते.


जिओ फायनान्शियल ही स्टॉक एक्सचेंजवर 34 वी सर्वात मोठी लिस्टेड कंपनी आहे. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह नंतर तिसरी सर्वात मोठी NBFC कंपनी बनली आहे.