Mukesh Ambani Jio Cinema: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता आणखी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. वेगाने उदयास येत असलेल्या ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेमध्ये मुकेश अंबानी धमाका करणार असल्याचे वृत्त आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंगमध्ये वर्चस्व असणाऱ्या नेटफ्लिक्स (Netflix) आणि अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी मुकेश अंबानी काही निर्णय घेणार आहेत. अंबानी यांनी जिओ सिनेमाच्या प्रीमियम कंटेट योजनेबाबत संकेत दिले आहेत. 


मुकेश अंबानींना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या जिओचा दबदबा वाढवायचा आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या नेतृत्वाखालील Jio Cinema ने आधीच वॉर्नर ब्रदर्स आणि HBO चे खास शो आपल्या लायब्ररीमध्ये समाविष्ट केले आहेत. JioCinema सदस्यांकडे आता अनेक लोकप्रिय HBO कार्यक्रम पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 


असे देणार आव्हान 


मुकेश अंबानींच्या JioCinema चा प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये उतरण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण समजला जात आहे.  999 रुपयांमध्ये JioCinema कडून  नेटफ्लिक्स, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना थेट आव्हान देण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. 


Netflix चा वार्षिक सबस्क्रिप्शनचा पर्याय देत नाही. हा प्लॅन 149 रुपयांपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, Amazon प्राइम व्हिडिओची वार्षिक सबस्क्रिप्शन 1499 रुपये आहे आणि Disney + Hotstar ची प्रीमियम वार्षिक सबस्क्रिप्शनचा  देखील 1499 रुपये आहे. JioCinema चे प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये इतरही फीचर्स आहेत.  एकाच वेळी 4 डिव्हाइसवर कंटेट स्ट्रीम करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 


आयपीएलमुळे जिओ सिनेमाचा फायदा 


JioCinema ने IPL 2023 चे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग ऑफर करून भारतात ऑनलाईन स्ट्रीमिंगमध्ये आपली जागा तयार करण्यास काही प्रमाणात यश मिळवले आहे. वॉर्नर ब्रदर्स आणि एचबीओकडून कंटेट आपल्या प्लॅटफॉर्मवर घेण्याचा निर्णय हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे, हे उघड आहे. 


आता येत्या काही महिन्यांत ऑनलाईन स्ट्रीमिंगमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येणार आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने हॉटस्टार+ हे  आता आगामी काळात जिओ सिनेमाच्या आव्हानाला कसे तोंड देतात हे पाहावे लागणार आहे. 


हॉटस्टारकडून  World Cup आणि Asia Cup चे मोफत स्ट्रीमिंग 


जिओ सिनेमाने यंदाची आयपीएल स्पर्धा मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग केल्यानंतर आता हॉटस्टारने देखील आगामी वर्ल्डकप आणि आशिया कप मोफत लाईव्ह स्ट्रिम करणार असल्याची घोषणा केली आहे. आशिया कप सप्टेंबर आणि ICC वर्ल्डकप २०२३ ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धाा हॉटस्टारवर मोफत पाहायला मिळणार आहेत.