Muhurat Trading 2023 : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणाऱ्यांनी मुहूर्त ट्रेडिंगबद्दल (Muhurat Trading) ऐकले असेलच. दिवाळी सणात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्यादृष्टीने याला खूप महत्त्व आहे. या दिवशी व्यावसायिक जगतात नवीन वर्ष सुरू होते. व्यापारी जगतात नवीन वर्षाची सुरुवात दिवाळीच्या दिवसापासून होते. विक्रम संवत 2079 हे वर्ष दिवाळीपासून सुरू होत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे उगमस्थान पूर्णपणे बंद करणे योग्य नाही. त्यामुळे त्या दिवशी काही वेळेसाठी शेअर बाजारात ट्रेंडिग केले जाते. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. शेअर बाजारात सायंकाळच्या वेळेस मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. हे खास ट्रेडिंग सत्र 1 तासासाठी असते. परंपरेनुसार या वेळीही मुहूर्ताची खरेदी-विक्री होणार आहे.
मुहूर्त ट्रेडिंग का केली जाते?
मुहूर्त ट्रेडिंग ही फक्त एक प्रतिकात्मक ट्रेडिंग असते. या दिवशी आगामी वर्षात शेअर बाजारातून चांगली भरभराट व्हावी यासाठी गुंतवणूक केली जाते. या दिवशी फार मोठे व्यवहार होत नाही. मात्र, गुंतवणूकदार थोड्या फार प्रमाणात खरेदी-विक्री करतात. याचाच अर्थ प्रातिनिधीक स्वरुपात ट्रेडिंग केली जाते.
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय?
राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुला असणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात प्री-ओपनिंग सत्र 8 मिनिटांसाठी असणार आहे. संध्याकाळी 6 ते 6.08 या वेळेत प्री-ओपनिंग सत्र असणार आहे. त्याशिवाय, ब्लॉक डील विंडो 5:45 वाजता उघडणार आहे. यानंतर सायंकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत बाजारात सामान्य गुंतवणुकदारांसाठी बाजार खुला असणार आहे.
>> मुहूर्त ट्रेडिंगचे शेड्यूल
> ब्लॉक डिल सेशन- सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत
> प्री-ओपनिंग सेशन- सायंकाळी 6 ते 6.08 वाजेपर्यंत
> नॉर्मल मार्केट - सायंकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत
> कॉल ऑक्शन सेशन - सायंकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत
> क्लोजिंग सेशन- सायंकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत
विक्रम संवत 2080 ची सुरुवात
या वर्षी विक्रम संवत 2080 ची सुरुवात मुहूर्ताच्या व्यवहाराने होणार आहे. यावेळी मुहूर्ताच्या व्यवहारात बाजार मजबूत राहील, असा अंदाज बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांत मुहूर्ताच्या वेळी बाजारात चांगली वाढ झाली आहे. काही प्रसंग वगळता, बहुतेक वेळा मुहूर्ताच्या व्यवहारादरम्यान बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे. गेल्या 10 पैकी 7 वेळा बाजार तेजी दिसून आली. तर, तीन वेळेस बाजार घसरण झाली.