मुंबई : मुहूर्त ट्रेडिंगच्या (Muhurat Day Samvat 2079) निमित्ताने शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 524 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 162 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,831 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्येही 0.88 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,730 अंकांवर स्थिरावला. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तासासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचा कार्यक्रम पार पडला जातो. आज हा मुहूर्त ट्रेडिंग 6.15 ते 7.15 या वेळेत पार पडला.
60 हजारांचा टप्पा गाठला नाही
मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारातील सेन्सेक्स आज 60 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सेन्सेक्स आज 59,831 अंकावर स्थिरावला. आज एकूण 2606 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 727 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
मुहूर्त ट्रेडिंग बंद होताना उर्जा, सार्वजनिक बँका आणि कॅपिटल गुड्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. आज Nestle India, ICICI Bank, HDFC, Larsen and Toubro अॅन्ड SBI या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर HUL, Kotak Mahindra Bank, HDFC Life आणि Adani Enterprises कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
शेअर बाजाराची सुरवात तेजीने
शेअर बाजारात आज एक तासाच्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात तेजीने झाल्याचं दिसून आलं. मुहूर्त ट्रेडिंगच्या सुरुवातीला सेन्सेक्स 663 अंकांनी उसळला आणि तो 59,970 अंकावर सुरू झाला. तर निफ्टीमध्येही 192 अंकाची वाढ होऊन तो 17,768 अंकांवर सुरू झाला.
मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमाने झाली. लक्ष्मीपूजनाच्या विशेष ट्रेडिंगसाठी अभिनेता अजय देवगनने उपस्थिती लावली. थॅंक गॉड आणि दृश्यम-2 च्या पार्श्वभूमीवर अजय देवगनने हजेरी लावली.
मुहूर्त ट्रेडिंगमधील ब्लॉक डील सेशनची वेळ सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत होती. त्यानंतर प्री-ओपनिंग सेशन सायंकाळी 6 वाजता सुरू होऊन ते 6.08 वाजेपर्यंत चाललं. सायंकाळी 6.15 वाजता नॉर्मल मार्केट खुलं झालं. ते संध्याकाळी 7.15 वाजेपर्यंत सुरू होतं. कॉल ऑक्शन सेशनचा कालावधी संध्याकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत होता तर क्लोजिंग सेशनची वेळ संध्याकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत होती.
मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा 50 वर्षांहून जुनी
शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा जवळपास 50 वर्षाहून अधिकची जुनी असल्याचं सांगितलं जातंय. दिवाळीच्या दिवशी केलेली गुंतवणूक लाभदायक समजली जाते. त्यामुळे आजची गुंतवणूक ही प्रतिकात्मक असून गुंतवणूकदारांचा कल हा खरेदीकडे अधिक असतो. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर बाजारात 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली.
वर्ष 2021 मध्ये कसं होतं मुहूर्त ट्रेडिंग?
मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी मुहूर्त ट्रेडिंग पार पडलं होतं. या विशेष एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. तर निफ्टी 17,921 अंकांवर स्थिरावला होता. यंदाच्या वर्षात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे.