MP Salary Hike News : केंद्र सरकारने खासदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. खासदारांच्या पगारात मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर दैनंदिन भत्ता आणि निवृत्ती वेतनात देखील वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही सुधारित वेतनश्रेणी 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. महागाई लक्षात घेऊन केंद्र सरकारने सभासद वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन कायदा, 1954 अंतर्गत वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली आहे.

खासदारांचे मासिक वेतन किती?

दरम्यान, पूर्वीच्या पगारापेक्षा आता खासदारांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. खासदारांचे मासिक वेतन पूर्वी 1,00,000 रुपये होते. आता ते वाढवून 1,24,000 रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. त्याच वेळी, दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरुन 2,500 रुपये करण्यात आला आहे. माजी खासदारांचे मासिक पेन्शन 25,000 रुपयांवरुन 31,000 रुपये करण्यात आली आहे. 5 वर्षांहून अधिक सेवेसाठी अतिरिक्त पेन्शन, जी पूर्वी 2,000 रुपये प्रति महिना होते, ते देखील बदलले आहे, आता ते 2,500 रुपये प्रति महिना केले आहे. 

गेल्या पाच वर्षांत महागाईत वाढ

सरकारने कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स लक्षात घेऊन ही पगारवाढ केली असून, त्याचा खासदारांना मोठा फायदा होणार आहे. यावर सरकारचे म्हणणे आहे की, गेल्या 5 वर्षातील वाढती महागाई लक्षात घेऊन ही पगारवाढ करण्यात आली आहे. हा बदल आरबीआयने ठरवलेल्या महागाई दर आणि खर्च निर्देशांकाच्या आधारे करण्यात आला आहे. याचा फायदा विद्यमान व माजी खासदारांना होणार आहे.

कर्नाटक विधानमंडळ

कर्नाटक सरकारने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या पगारात 100 टक्के वाढ मंजूर केल्यानंतर काही दिवसांतच हे पाऊल उचलण्यात आले आहे. यावरुन विधानसभेत जोरदार चर्चा झाली. पगारवाढीचा निर्णय कर्नाटक मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते (सुधारणा) विधेयक 2025 आणि कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि भत्ते विधेयक 2025 या दोन दुरुस्ती विधेयकांद्वारे देण्यात आला.

डीए वाढीचा निर्णय कधी येणार?

सरकारी कर्मचारीही बऱ्याच दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सरकार याला मंजुरी देऊ शकते. मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2025 पासून डीए लागू होणार असून कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळाल्यास त्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची थकबाकीही मिळू शकेल.

महत्वाच्या बातम्या:

नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?