नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे. अमेरिकेनं आता भारतावर लादलेलं टॅरिफ आता 50 टक्क्यांवर पोहोचलं आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवल्यानं भारतावर ही कारवाई केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला भारताच्या विदेश मंत्रालयानं उत्तर दिलं आहे. अमेरिका भारताला रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं लक्ष्य करत असल्याचं विदेश मंत्रालयानं म्हटलंय. विदेश मंत्रालयासोबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प ब्लॅकमेल करत असल्याचं म्हटलंय.
अमेरिकेने अलिकडच्या काळात रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारताला लक्ष्य केलं आहे. विदेश मंत्रालयानं म्हटलं की आम्ही या मुद्द्यांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, ज्यामध्ये आमची आयात बाजारपेठेच्या घटकांवर आधारित आहे आणि भारतातील 1.4 अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या एकूण उद्देशाने केली जाते.
विदेश मंत्रालयाकडून याबाबत इतर देशांचा दाखला देखील अमेरिकेला देण्यात आला आहे. भारतानं ज्याप्रमाणं इतर अनेक देश स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृती करतात त्याप्रमाणं केलेल्या कृतीमुळं अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा पर्याय निवडला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अयोग्य, अन्यायी आणि अवास्तव आहे, असं विदेश मंत्रालयानं म्हटलं.
भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल, असा इशारा देखील विदेश मंत्रालयानं दिला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेलं टॅरिफ हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ट्रम्प यांचा ५०% कर हे आर्थिक ब्लॅकमेलिंग आहे. भारताला एका अन्यायी व्यापार करारात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कमकुवतपणाला भारतीय लोकांच्या हितापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये, असा टोला देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना लागवला आहे.