Nandani Math Mahadevi Elephant : कोल्हापूरवासियांच्या भावना दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, नांदणी मठाची माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिला. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक मदत पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचंही वनताराच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करू असंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्यात आलं आहे. मात्र स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हत्तीणीला परत पाठवण्याबद्दल वनतारानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या संबंधी नांदणी मठाधिपती आणि वनताराच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.
माधुरीसाठी सर्व व्यवस्था नांदणी मठात करणार
माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत पाठवण्यासंबंधी सर्व ती प्रक्रिया करणार, त्यासाठी अत्यावश्यक सर्व पत्रव्यवहार करणार असल्याचं वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सांगितलं. वनतारा, सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी सर्व त्या सुविधा निर्माण करण्यात येतील आणि नंतर माधुरीला परत पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोल्हापूरवासियांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता
वनताराचे सीईओ म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आलं. कोल्हापूरकरांच्या माधुरीला वनतारामध्ये सर्वात चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण माधुरीसंबंधी कोल्हापूरकराच्या भावना आमच्या लक्षात आल्या. कोल्हापूरकरांच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. यामध्ये कुणाचा विजय किंवा पराजय नाही. हा हत्तीचा विजय आहे. वनतारामध्ये तिला चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि नांदणी मठामध्येही तिला सर्वात चांगल्या सुविधा मिळतील. त्यामुळे या सर्वामध्ये माधुरीचा विजय आहे."
माधुरीसाठी नांदणी मठामध्ये पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत करणार असल्याचं सीईओंनी सांगितलं. माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परत येणार असा शब्दही त्यांनी दिला.
नांदणी मठामध्ये असलेल्या माधुरी हत्तीणीला जखमा झाल्या आहेत, तिच्या हक्कांचं उल्लंघन केलं जातं अशा आशयाची एक याचिका पेटा या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोल्हापूरवासियांनी नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व भावना लक्षात घेता वनताराच्या अधिकाऱ्यांनी माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.