मुंबई : म्डाडाच्या (MHADA) मुंबई मंडळासाठी एकूण 2030 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सध्या राबवली जात आहे. या लॉटरीत अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली असून आता म्हाडाने पात्र उमेदवारांची यादी शुक्रवारी (4 सप्टेंबर) जाहीर केली आहे. या यादीनुसार एकूण 1 लाख 13 हजार 811 अर्जदारांपैकी 1 लाख 13 हजार 235 अर्जदार पात्र ठरले आहेत. तर उर्वरीत 576 अर्जदार हे अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे या लॉटरी प्रक्रियेत अनेक लोकप्रतिनिधी तसेच सिनेसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शकांनीही सहभाग घेतला आहे. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, अभिनेता प्रविण डाळिंबकर, अभिनेता गौरव मोरे यांचाही समावेश आहे.
बिग बॉसच्या विजेत्यानेही केला अर्ज
मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार राजू शेट्टी यांनी पवईतील मध्यम गटातील घरासाठी म्हाडाच्या लॉटरीत सहभाग घेतला आहे. त्यांनी त्यासाठी रितसर अर्ज केला आहे. तसेच बिग बॉसचा विजेता विशाल निकम यानेदेखील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातील निखील बने यानेदेखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे.
अपात्र अर्जदारांना दोन दिवसांची मुदत
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या 576 अर्जदारांचे अर्ज हे म्हाडाने नामंजूर केले आहेत. योग्य आणि आवश्यक असलेली कागदपत्रे जमा न करणे, अर्जात चुकीची माहिती देणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. मात्र अर्ज नामंजूर झालेले असले तरी या अर्जदारांना त्यांच्या सूचना आणि हरकती मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आळेला आहे. या हरकती आणि सूचनांचा विचार करून म्हाडा 3 ऑक्टोबर रोजी म्हाडा लॉटरीतील पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करणार आहे.
कोणकोणत्या दिग्गजांनी म्हाडासाठी केले अर्ज
राजी शेट्टी हे माजी खासदार आहेत. त्यांनी पवईतील घरासाठी म्हाडाच्या लॉटरीत सहभाग घेतला आहे. सोबतच निखील बने, विशाल निकम यांनीदेखील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केले आहेत. यासह अभिनेता प्रविण डाळिंबकर, अभिनेता गौरव मोरे यांनीदेखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे. गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे, अभिनेता विजय आंदळकर यांनीही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केलेला आहे. शंतून रोडे यांना सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. राजू शेट्टी यांच्यासह अन्य पाच लोकप्रतिनिधींनीदेखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे.
हेही वाचा :
आता दसऱ्याआधीच दिवाळी! ऑक्टोबरमध्ये सिडको 25 हजार घरं विकणार, जाणून घ्या सविस्तर!