मुंबई : म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी लॉटरी काढली होती. या घरांसाठी 1 लाख 13 हजार 568 अर्ज दाखल झाले आहेत. म्हाडानं या लॉटरीच्या माध्यमातून केवळ अर्जाच्या शुल्कातून 5 कोटी 67 लाख रुपयांची कमाई केली आहे. म्हाडाच्या घरासांठीच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असल्यास 590 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं होतं. त्यामध्ये जीएसटीचा देखील समावेश होता.
म्हाडानं सुरुवातीला अर्ज सादर करण्यास 26 दिवसांची मुदत दिली होती. त्या कालावधीमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला होता. म्हाडानं त्यानंतर विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किमती कमी केल्या याशिवाय अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देखील दिली होती. या मुदतवाढीच्या काळात मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर करण्यात आले.
म्हाडाकडे एकूण 113568 अर्ज अनामत रकमेसह जमा झाले. या अर्जांच्या शुल्कातून म्हाडाकडे 5 कोटी 67 लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. या प्रकरणी नवभारत टाईम्स या वृत्तपत्रानं वृत्त दिलं आहे.
म्हाडाकडून सोडत 8 ऑक्टोबरला
म्हाडानं दिलेली मुदतवाढ 19 सप्टेंबरला संपली त्यानंतर आता घरांच्या लॉटरीसाठी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांची यादी 27 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता यादी जाहीर होणार आहे. या यादीवर आक्षेप घ्यायचा असल्यास अर्जदारांना 29 सप्टेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. तर, म्हाडाकडून अंतिम यादी 3 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. तर, म्हाडाकडून 8 ऑक्टोबरला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात सोडत काढली जाईल. म्हाडाच्या लॉटरीमध्ये ज्यांना घरं लागतील त्यांना 25 टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात भरावी लागेल. तर, 10 टक्के रक्कम भरल्यानंतर कर्जासाठी म्हाडाकडून प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. मात्र, ज्यांना घर लागणार नाही त्यांनी भरलेली अनामत रक्कम 9 ऑक्टोबरपासून परत देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
म्हाडाची घरं कोणत्या भागात?
मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विविध उत्पन्न गटातील 2030 घरं सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. म्हाडानं या घरांपैकी 370 घरांच्या किमतीत 12 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती कमी करण्यात आल्या. मुदतवाढ आणि घरांच्या किमती कमी केल्यानं नागरिकांचा या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे.
इतर बातम्या :