Mango : आंबा (Mango) हे जगातील लोकांचे सर्वात आवडते फळ आहे. दरवर्षी हंगामात आंब्यांना मोठी मागणी असते. दरम्यान, यावेळी आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. कारण बदलत्या हवामानाचा पिकावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं उत्पादनात घट होणार आहे. 


यावेळी दशहरी, चौसा, लंगडा, मालदा या प्रसिद्ध वाणांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण वातावरणातील बदलामुळं यंदा आंबा पिकाला आतापर्यंत कमी फुले आली आहेत. प्रत्येक वेळी फेब्रुवारी महिन्यात आंबा पिकाला मोहोर येतो. मात्र यावेळी तसे झाले नाही. वातावरणातील बदलाच्या प्रभावामुळे यावेळी आंबा पिकाला अधिक फटका बसला आहे. हवामानाचा आंबा पिकावर होणारा परिणाम लक्षात घेता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे शास्त्रज्ञही चिंतेत आहेत. यावेळी आंबा पिकासाठी मार्चचा पहिला आठवडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे येथील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मार्चमध्ये आंब्याच्या झाडांना मोहोर आला नाही, तर यावेळीही आंबा उत्पादनातही घट होणार आहे.


आंब्यावर हवामान बदलाचा परिणाम


वातावरणातील बदलामुळे जगभरातील धान्यांपासून भाजीपाला पिकांवर आधीच परिणाम होत आहे. आता बागकामावरही परिणाम होत आहे. वातावरणातील बदलामुळे केवळ उत्पादनच कमी झाले नाही तर अनेक पिकांचे भावही वाढले आहेत. यावेळी हवामानातील बदलाचाही आंबा पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रभातकुमार शुक्ला यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान प्रत्येक वेळी १५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असे, जे आंबा पिकासाठी अतिशय चांगले मानले जाते. मात्र यावेळी संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली राहिले. त्यामुळे यंदा आंबा पिकाला फुले वेळेवर आली नाहीत.


उत्तर भारतातील आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे किमान आणि कमाल तापमानात सातत्याने तफावत आहे. अवकाळी पावसामुळे किमान तापमानातही वाढ होत नाही. त्यामुळे यावेळी केवळ 10 टक्के आंब्याच्या झाडांना मोहोर आला असून 90 टक्के झाडे अद्याप उघडी आहेत. संपूर्ण उत्तर भारताची ही स्थिती आहे, तर दक्षिण भारतात यावेळी आंब्याचे पीक चांगले आहे.


आंब्यासाठी अधिक पैसे खर्च करावा लागणार 


यावेळी लोकांना आंब्याच्या गोडीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. यावेळी हवामान बदलाचा परिणाम पिकांवर झाल्याने उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. यामुळे यावेळी लोकांना महागडा आंबा खरेदी करावा लागू शकतो.


देशात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन उत्तर प्रदेशात


देशात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन उत्तर प्रदेशात होते. पण यावेळी कदाचित यामध्ये बदल होऊ शकतो. हवामान बदलाच्या प्रभावामुळं बहुतांश आंबा पिकांना अद्याप मोहोर आलेला नाही. त्यामुळं फळधारणेची शक्यताही कमी होऊ लागली आहे. ही स्थिती केवळ लखनौमधील मलिहाबादचीच नाही तर मेरठ, सहारनपूरच्या चौसा पट्ट्यात आणि पूर्वांचलच्या लंगडा आंब्याच्या बागांचीही आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही हीच परिस्थिती आहे. किमान तापमानात वाढ झाल्यास काही बदल नक्कीच होऊ शकतात. अन्यथा या वेळी आंब्याच्या झाडांना गतवर्षीप्रमाणे पीक येणार नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.