मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केला. यावेळी अजित पवार यांनी शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर असेल, असे सांगितले. 'महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही', अशी घोषणा देत अजित पवार (FM Ajit Pawar) यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्यात वाढणे आणि लोकांची क्रयशक्ती वाढण्याची गरज असल्याचे म्हटले. राज्यात मोठ्याप्रमाणावर देशांतर्गत आणि परेदशी गुंतवणूक येत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी अजित पवार यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाचे धोरण सादर केले. मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच “ग्रोथ हब” म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत.त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तसेच बंगळुरु-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉरसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षणप्रवण भागात उद्योगांची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरीता “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन” ची स्थापना करण्यात येणार आहे, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
गडचिरोली स्टील हब म्हणून विकसित करणार: अजित पवार
नक्षलग्रस्त अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा हा अलीकडच्या काळात स्टील हब म्हणून उदयालायेत आहे. दावोस आर्थिक परिषदेत गडचिरोली जिल्ह्यासाठी 21830 कोटी रुपयांचे करार झाले. या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 7500 इतके रोजगार निर्माण होतील. याशिवाय, गडचिरोलीत दळणवळण सुलभ व्हावे, यासाठी खनिकर्म महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी 500 कोटी रुपयांचा कामे केली जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अजितदादांची चारोळी
अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात एका चारोळीने केली. "लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी 12 प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही, पुन्हा आलो, पुन्हा आलो, पुन्हा आलो", असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच 'महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही' असे वाक्यही त्यांनी उच्चारले.
अर्थसंकल्पात मुंबईसाठी आणखी काय-काय घोषणा?
* गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
* पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर निर्मितीच्या 4 हजार 259 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या सहभागाने मंजूरी देण्यात आली आहे.
* मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
* मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
* स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
* उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
* नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. तेथून एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
आणखी वाचा