मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) मतमोजणी होत आहे. दुपारपर्यंत देशातील बहुसंख्य जागांवरील कल स्पष्ट होतील. दरम्यान, एक्झिट पोलमध्ये भाजपची एकहाती सत्ता येईल, असे सांगितले जात होते. पण आज प्रत्यक्ष मतमोजणीदरम्यान, निकालात चढउतार पाहायला मिळतोय. त्याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी गुंतवणूकदारांनी भरभरूप पैस कमवले. पण आज मात्र शेअर बाजार (Share Market) चांगलाच गडगडला आहे.


एनएसई, बीएसईची सध्याची स्थिती काय?


निवडणुकीच्या निकालामुळे सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअराचा निर्देशांक सेन्सेक्स सध्या तब्बल 2206.86 अंकांनी गडगडला आहे. कालच्या तुलनेत ही 2.89 टक्क्यांची घसरण आहे. दुसरीकडे निफ्टी 50 मध्येही 2.97 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या निफ्टी 50 निर्देशांक 22572.80 अकांवर आहे.


कंपन्यांचे बाजार भांडवल घसरले


शेअर बाजाराच्या या अनपेक्षित वळणामुळे गुंतवणूकदारांचे पहिल्या 20 मिनिटांत तब्बल 20 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. परिणामी आज सत्र चालू होताच शेअर बाजारावर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल धसरले. मुंबई शेअर बाजारावरील कंपन्यांचे हे भांडवल सोमवारी 426 लाख कोटी रुपये होते. आज हेच भांडवल 406 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे.


अदाणी उद्योग समुहाचे शेअर्स गडगडले 


एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच निकाल लागेल अशी अनेकांना अपेक्षा होती. पण सध्या एनडीए आणि इंडिया आघाडीत अटीतटीच लढत होताना दिसत आहे. त्याचा परिणाम अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपनीवर झाला. सध्या या कंपनीचा शेअर साधारण 5.92 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या या शेअरचे मूल्य 3425.80 रुपयांवर पोहोचले आहे. कालच्या तुलनेत या शेअरचे मूल्य 221 रुपयांनी कमी झाले आहे. अदाणी उद्योग समुहाच्या अदाणी एनर्जी सोल्यूशन्स  (5.52 टक्के), अदाणी विलमर (3 टक्के), अदाणी ग्रीन एनर्जी (5.53 टक्के), अदाणी पोर्ट्स (6.82 टक्के), अदाणी एटंरप्रायझेस (6.64 टक्के), अदाणी टोटल गॅस (6.78 टक्के), अदाणी पावर (3 टक्के) अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स सध्या गडगडले आहेत.  


हेही वाचा :


Lok Sabha Election Result Share Market Live Update : शेअर मार्केटमध्ये उलथापालथ, सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला


लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आणि शेअर बाजाराचा संबंध काय? जाणून घ्या 20 वर्षांचा इतिहास