LIC Stake in HDFC Bank: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसी (LIC) एचडीएफसी बँकेतील (HDFC) आपला हिस्सा वाढवत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एलआयसीला खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेतील आपला हिस्सा वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळं एलआयसी आता एचडीएफसी बँकेतील 9.99 टक्के भागभांडवल खरेदी करु शकणार आहे. यासंबंधी एलआयसीने काही काळापूर्वी RBI कडे अर्ज केला होता. त्याला आता परवानगी मिळाली आहे. सध्या एचडीएफसी बँकेत एलआयसीचा हिस्सा हा 5.19 टक्के आहे.


RBI कडून मंजुरी घेणं गरजेचं


एचडीएफसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने एलआयसीला एका वर्षाच्या आत एचडीएफसी बँकेतील अधिक हिस्सा खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच RBI ने LIC ला बँकेतील आपली हिस्सेदारी 9.99 टक्क्यांपेक्षा जास्त न वाढवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणत्याही संस्थेला कोणत्याही बँकेतील 5 टक्क्यांपेक्षा जास्त भागभांडवल खरेदी करायचे असेल, तर त्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी, 5 टक्क्यांपेक्षा कमी भागभांडवल खरेदी करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.


एचडीएफसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेने 16 जानेवारी रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत बँकेचा नफा 33.5 टक्क्यांनी वाढून 16,372 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत बँकेचा नफा 12259 कोटी रुपये होता. त्याच वेळी, बँकेचे एकूण उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 51,208 कोटी रुपयांवरून 81,720 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर एचडीएफसीच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आणि गेल्या आठवड्यात बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. गुरुवारी बँकेच्या शेअर्समध्ये 1.04 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि तो 1,440.70 रुपयांवर बंद झाला. तर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 0.51 टक्क्यांनी घसरला आणि 70,700.67 वर बंद झाला.


महत्त्वाच्या बातम्या:


सरकारी बँकांसांठी एक दिलासादायक बातमी, 3 बँकांनी 3 महिन्यांत कमावले 6498 कोटी रुपये