LIC Share Price : शेअर बाजारात अवघ्या महिनाभरापूर्वी लिस्ट झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीच्या (LIC) शेअर गुंतवणुकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरूच आहे. एलआयसीचा शेअर दर 800 रुपयाच्या खाली गेला. एलआयसीच्या शेअरने 782 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला आहे. या घसरणीसह एलआयसीचे बाजार भांडवल (Market Capitalization) पाच लाख कोटींपेक्षाही कमी झाले आहे.


शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आजही एलआयसीच्या शेअर दरात 2 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे शेअर 782.50 रुपयांच्या स्तरावर गेला होता. बाजारातील घसरणीमुळे एलआयसीचे बाजार भांडवल 5 लाख कोटींहून कमी झाले आहे. सध्या एलआयसीचे बाजार भांडवल 4.96 लाख कोटी रुपये राहिले आहे.


गुंतवणुकदारांना एक लाख कोटींचा फटका


एलआयसी आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. एलआयसीने आपल्या शेअरची किंमत 949 रुपये प्रति शेअर इतकी निश्चित केली होती.  आता एलआयसी गुंतवणुकदारांना 165 रुपये प्रति शेअर नुकसान झाले आहे. गुंतवणुकदारांचे जवळपास एक लाख कोटींचे नुकसान झाले आहे. 


ब्रोकरेज फर्मने दिला इतका टार्गेट प्राइस


या दरम्यान, ब्रोकरेज फर्म Emkay Global ने एलआयसीसाठी टार्गेट प्राइस दिली आहे. फर्मने एलआयसीला होल्ड रेटिंगसह 875 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे.  Emkay Global ने दिलेल्या टार्गेट प्राइसनंतरही आयपीओ गुंतवणुकदारांना फारसा फायदा होणार नाही. ब्रोकरेज फर्मने एलआयसीला हत्ती संबोधत हत्तीकडून नृत्याची अपेक्षा करू नये असे म्हटले होते. 


शेअर बाजारातून कमाई


भारतीय शेअर बाजारातून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) चांगलाच नफा कमावला आहे. एलआयसीने शेअर बाजारातून 42 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीची ही कमाई झाली आहे.  त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीने 36 हजार कोटींचा नफा कमावला होता. LIC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते.