LIC Share News : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टिंग) होताना गुंतवणुकदारांची निराशा झाली. एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होताना चांगल्या प्रीमियमसह लिस्ट होईल अशी अपेक्षा होती. मात्र,  गुंतवणुकदारांचे नुकसान झाले. 


LIC IPO ची लिस्टिंग डिस्काउंटमध्ये झाल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. गुंतवणुकदारांसमोर आता पुढे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. एलआयसी कंपनीवर लोकांचा विश्वास असला तरी शेअर बाजारात बसलेल्या झटक्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. 


एलआयसीचा आयपीओ लिस्ट होताना गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळावा अशी अपेक्षा सरकारचीदेखील होती. सरकारने एलआयसीच्या कमकुवत लिस्टिंगबाबत भाष्य केले आहे. बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले असल्याचे सरकारने म्हटले आहे. एलआयसीच्या कमकुवत लिस्टिंगचे खापर सरकारने बाजारावर फोडले आहे. 


DIPAM चे सचिव तुहिनकांत पांडेय यांनी सांगितले की, शेअर बाजारात असलेल्या अस्थिर वातावरणामुळे एलआयसीची कमकुवत लिस्टिंग झाली आहे. गुंतवणुकदारांनी दीर्घकाळ गुंतवणुक करावी अशी सूचनाही सरकारने केली आहे. त्यांनी सांगितले की, पॉलिसीहोल्डर्स, किरकोळ गुंतवणुकदार आणि कर्मचाऱ्यांना डिस्काउंट दरात शेअर मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना कमी नुकसान झाले आहे. एलआयसीने 949 रुपये प्रति शेअर या दराने गुंतवणुकदारांना शेअर दिले आहेत. 


ब्रोकरेज फर्म काय म्हणतात?


मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसच्या हेमांग जानी यांनी म्हटले की, एलआयसीची लिस्टिंग कमी किंमतीत झाली. मात्र, आकर्षक मूल्यांकन आणि बाजारातील स्थिरता लक्षात घेता किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणुकदार एलआयसीकडे वळू शकतात असे त्यांनी म्हटले. 


Macquarie या परदेशी ब्रोकरेज फर्मने एलआयसीला टार्गेट प्राइस 1000 रुपये सांगितले आहे. त्याशिवाय न्यूट्रल रेटिंगही दिली आहे. Macquarie चे टार्गेट प्राइसिंग  इश्यू किंमतीपेक्षा 5.37 टक्के अधिक आहे. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. )