LIC Result : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) संचालक मंडळाची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एलआयसी पहिल्यांदाच मार्च तिमाही निकाल जाहीर करणार आहे. एलआयसीच्या आजच्या या बैठकीकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. एलआयसी शेअर गुंतवणुकदारांची या बैठकीकडून अपेक्षा आहे. 


एलआयसी शेअर बाजारात लिस्ट होताना 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जवळपास 9 टक्क्यांच्या डिस्काउंट दरात शेअर लिस्ट झाला. त्यानंतर काही वेळेसाठी एलआयसीच्या शेअरने उसळी घेतली होती. मात्र, त्यानंतर सतत घसरण सुरू होती. मागील एक-दोन दिवसांपासून एलआयसीच्या शेअर दरात चढ-उतार सुरू आहे. एलआयसीचा शेअर दर वधारत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र, लिस्टिंग प्राइज दर अजूनही गाठला नाही. आज, एलआयसीच्या शेअर दराने 833 रुपये इतका उच्चांकी दर गाठला, त्यानंतर सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास 829 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता. 


चांगला लाभांश मिळण्याची शक्यता 


शेअर दरात मोठी घसरण झाली असली तरी  एलआयसीच्या गुंतवणुकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एलआयसी लाभांश जाहीर करण्याची शक्यता दाट शक्यता आहे. या लाभांशामुळे गुंतवणुकदारांना किमान काही फायदा व्हावा यासाठी एलआयसी निर्णय घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


कंपनीने मागील वर्षीदेखील लाभांश दिला नव्हता. केंद्र सरकारला एलआयसीचे 25 टक्के शेअर विकायचे आहेत.  आयपीओच्या माध्यमातून सरकारने फक्त 3.5 टक्के शेअर्स विक्री केली आहे. सरकार येत्या काळात एफपीओ देखील आणू शकते. एफपीओला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आयपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांनाही फायदा मिळावा यासाठी एलआयसीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. 


शेअर बाजाराचीही नजर 


एलआयसीच्या निकालावर शेअर बाजारातील गुंतवणुकदारांची नजर असणार आहे. एलआयसीने चांगली कामगिरी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम शेअर दरावर होऊ शकतो. सध्या देशातील विमा बाजारात एलआयसीचा वाटा हा 60 टक्क्यांच्या आसपास आहे. इतर विमा कंपन्यांकडून एलआयसीला आव्हान निर्माण केले जात आहे.