Crude Oil Price Hike : देशात पुन्हा एकदा  इंधन दरवाढीचे चटके बसण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याच्या परिणामी भारतातही इंधन दरवाढीचा भडका उडण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. 


चीनमुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ


आंतरराष्ट्रीय बाजारात युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर कच्च्या तेलाच्या दराने 2008 नंतर पहिल्यांदा 139 डॉलर प्रति बॅरल इतका उच्चांकी दर गाठला होता. रशियाकडून तेल आयात करण्यास युरोपीयन देशांनी निर्बंध लागू केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले होते. आता चीनमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या परिणामीदेखील कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. लॉकडाउन निर्बंध शिथील झाल्याने इंधनाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि अपुरा असणारा पुरवठा यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे.


भारताची चिंता वाढली 


कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या दरवाढीमुळे भारताची चिंता वाढली आहे. भारतात, 22 मार्च ते 6 एप्रिल 2022 दरम्यान पेट्रोल डिझेल आधीच 10 रुपये प्रति लिटरने महागले आहे. मात्र, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलवर प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी करण्यात आले. त्यानंतर आता पु्न्हा कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.   


सध्या इंधन दर काय?


आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.