LIC Share News : बहुप्रतिक्षित असलेल्या एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात आज सूचीबद्ध (लिस्टिंग) झाला. शेअर बाजारात लिस्ट होताना एलआयसीचा शेअर जवळपास 9 टक्के डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. एलआयसीच्या या निराशाजनक लिस्टिंगचा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. एलआयसीने आपल्या प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती. मात्र, डिस्काउंट लिस्टिंगमुळे गुंतवणुकदारांना 42 हजार 500 कोटींचा फटका बसला आहे.
एलआयसीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसनुसार कंपनीचे बाजार भांडवल मूल्य हे 6 लाख कोटींपेक्षा अधिक होते. मात्र कमकुवत लिस्टिंगमुळे यामध्ये 42 हजार 500 कोटींची घट झाली. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 60 रुपये प्रति शेअर सवलत देण्यात आली होती.
आज शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर एलआयसी ही सर्वाधिक बाजार भांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली देशातील पाचवी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल 16.42 लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर टाटा समुहाची टीसीएस, एचडीएफसी बँक आणि देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा क्रमांक येतो.
एलआयसीच्या शेअरचा दर वधारणार?
मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसच्या हेमांग जानी यांनी म्हटले की, एलआयसीची लिस्टिंग कमी किंमतीत झाली. मात्र, आकर्षक मूल्यांकन आणि बाजारातील स्थिरता लक्षात घेता किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणुकदार एलआयसीकडे वळू शकतात असे त्यांनी म्हटले.
1000 रुपयांपर्यंत शेअर दर?
Macquarie या परदेशी ब्रोकरेज फर्मने एलआयसीला टार्गेट प्राइस 1000 रुपये सांगितले आहे. त्याशिवाय न्यूट्रल रेटिंगही दिली आहे. Macquarie चे टार्गेट प्राइसिंग इश्यू किंमतीपेक्षा 5.37 टक्के अधिक आहे.
दरम्यान, एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली होती. मात्र, भारतातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियमचा दर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला वधारला होता. त्यानंतर हा प्रीमियम दर घसरू लागला होता. एलआयसीची लिस्टिंग सवलतीच्या दरात होण्याचे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत होते. त्यानंतर आज एलआयसी शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये काही निराशेचे वातावरण आहे.