LIC Listing Price: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. शेअर बाजारात एलआयसी आठ टक्क्यांच्या डिस्काउंट दराने लिस्ट झाला आहे. बीएसईवर एलआयसीचा शेअर दर 867.20 रुपये आणि एनएसईवर 872 रुपये प्रति शेअर या दरावर लिस्ट झाला आहे. एलआयसीने आपल्या प्रति शेअरसाठी 949 रुपये इतकी किंमत निश्चित केली होती. केंद्र सरकारने एलआयसीमधील आपला 3.5 टक्के हिस्सा विकला आहे.
एलआयसी लिस्टिंगच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला 'डिपम'चे सचिव तुहिनकांता पांडे, एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार, बीएसईचे अध्यक्ष आशिष चौहान आदींसह इतर मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली होती. मात्र, भारतातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियमचा दर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला वधारला होता. त्यानंतर हा प्रीमियम दर घसरू लागला होता. एलआयसीची लिस्टिंग सवलतीच्या दरात होण्याचे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत होते. त्यानंतर आज एलआयसी शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये काही निराशेचे वातावरण आहे.
एलआयसी होणार देशातील पाचवी मोठी कंपनी
उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे. बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे.
एलआयसी IPO ला चांगला प्रतिसाद
एलआयसी आयपीओला गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक सब्सक्रिप्शन पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात झाले. पॉलिसीधारकांसाठीच्या कोट्यात 6.12 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते. त्याच वेळेस एलआयसीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 4.4 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते.